महापौरांचा राजीनामा नसल्याने भाजपात वाढली नाराजी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 09:48 PM2019-11-27T21:48:35+5:302019-11-27T21:48:45+5:30
जळगाव : मनपा महापौर, उपमहापौरांना निश्चित केलेला १० महिन्यांचा कार्यकाळ व चार महिन्यांची मुदतवाढ केलेला कार्यकाळ पूर्ण होवूनही महापौर ...
जळगाव : मनपा महापौर, उपमहापौरांना निश्चित केलेला १० महिन्यांचा कार्यकाळ व चार महिन्यांची मुदतवाढ केलेला कार्यकाळ पूर्ण होवूनही महापौर सीमा भोळे व उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असून, काही नाराज नगरसेवकांच्या गटाने मनपात गुप्त बैठक घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी ही बैठक झाली असून, या बैठकीत भाजपाचे ८ ते ९ नगरसेवक उपस्थित होेते. २०१८ मध्ये मनपात भाजपाची सत्ता आल्यानंतर सीमा भोळे यांना महापौर व तर डॉ.अश्विन सोनवणे यांना उपमहापौरपद देण्यात आले होते. हे पद १० महिन्यांसाठी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. जुलै २०१९ मध्ये ही मुदत संपली मात्र विधानसभा निवडणुकांमुळे महापौर, उपमहापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदतही संपली असतानाही महापौर, उपमहापौरांनी राजीनामा न दिल्याने भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीचा सुर वाढत आहे. याच नाराज गटाची बैठक महापालिकेत झाली.
याबाबत वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज होती. राज्यातील सत्तेच्या पेचामुळे गिरीश महाजन हे व्यस्त आहेत.
मात्र, महापौर, उपमहापौरांनी मुदत संपल्यामुळे राजीनामा द्यायला हवा होता. आमदार सुरेश भोळे देखील याबाबत गंभीर नसून, त्यांनी वरिष्ठ नेत्यांचा अनुपस्थितीत याबाबत निर्णय घेवून, महापौरांचा राजीनामा घ्यायला हवा अशा भावना या बैठकीत नगरसेवकांनी व्यक्त केल्या.
मनपाच्या ‘त्या’जागेच्या विषयावरून आमदार नाराज
1 स्थायी समितीच्या सभेत स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी रिंगरोडवरील मनपाने आपल्या मालकीच्या जागेवर महिला मंडळाला दिलेली जागा जिल्हा बॅँकेला भाडे तत्वावर दिली असल्याने ही जागा मनपाने ताब्यात घेण्याच्या सूचना अॅड.हाडा यांनी दिल्या होत्या.
2 त्यावरून आमदार सुरेश भोळे यांनी नगरसेविका दीपमाला काळे यांचे पती मनोज काळे यांच्याकडे अॅड.हाडा यांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत, या निर्णयामुळे भांडण लावण्याचे काम केले जात असल्याचे आमदार भोळे यांनी म्हटल्याची माहिंती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
3 जिल्हा बॅँकेत सुरेश भोळे हे संचालक आहेत. जिल्हा बॅँकेच्या शाखेला दिलेली जागा मनपा ताब्यात घेत असल्याने जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांच्याकडे चुकीचा संदेश जाईल अशी भिती आमदार भोळे यांनी व्यक्त केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
4 याबाबत अॅड.हाडा यांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांच्याशी चर्चा करून या जागेचा व्यावसायिक वापर महिला मंडळाकडून होत असून, याबाबत मनपाने २००६ मध्ये ८१ ब ची नोटीस बजाविली असल्याची माहिती दिली. त्यावर खडसे यांनी अॅड.हाडा यांचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. मात्र, यावरून भाजपा आमदार व काही नगरसेवकांमध्ये सर्व काही आलबेल दिसून येत नाही.