मतभेदावर मात करीत भाजपाच्या यशमालिकेची हॅटट्रीक

By admin | Published: February 23, 2017 10:28 PM2017-02-23T22:28:51+5:302017-02-23T22:28:51+5:30

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ३३ जागा मिळवत जळगाव हा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. पक्षांतर्गत मतभेदावर मात करीत भाजपाने

BJP's Yatmalik's hat-trick over marginalization | मतभेदावर मात करीत भाजपाच्या यशमालिकेची हॅटट्रीक

मतभेदावर मात करीत भाजपाच्या यशमालिकेची हॅटट्रीक

Next

ऑनलाइन लोकमत/मिलिंद कुलकर्णी

जळगाव, दि. 23 - जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ३३ जागा मिळवत जळगाव हा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. पक्षांतर्गत मतभेदावर मात करीत भाजपाने नेत्रदीपक यश मिळविले आहे. बहुमतासाठी केवळ एक जागा कमी पडत असल्याने भाजपापुढे दोन पर्याय उपलब्ध आहेत. राज्यपातळीवर शिवसेनेशी युती झाल्यास पुन्हा एकदा भाजपा-शिवसेनेची सत्ता येईल किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील सदस्य फोडून शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येईल.
दोन खासदार, ६ आमदार, दोन विधान परिषद सदस्य, दूध संघ, जिल्हा बँक, ७ नगरपालिकांवर वर्चस्व राखणाऱ्या भाजपाने जिल्हा परिषदेत लक्षणीय यश मिळविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसावद येथे जाहीर सभा घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांच्या सभेला माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे व्यासपीठावर एकत्र होते. भाजपामध्ये मतभेद नसल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजपा यशस्वी ठरला. राज्यस्तरीय नेते असलेल्या खडसे यांनी मुक्ताईनगरवगळता जिल्ह्यात कोठेही सभा घेतली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक काळात दोन दिवस मुक्काम ठोकून यशस्वी नियोजन केले. गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी नियोजन यशस्वीपणे अंमलात आणले. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला.
गेल्या १५ वर्षांपासून भाजपा आणि शिवसेना या निवडणुका स्वतंत्रपणे लढवतात, परंतु सत्तेसाठी एकत्र येत असल्याचा इतिहास आहे. यंदा भाजपाने नियोजनपूर्वक इतर पक्षातील सक्षम आणि तुल्यबळ उमेदवारांना तिकीटे दिली. ज्या तालुक्यांमध्ये भाजपा शक्ती कमी होती, तिथे ‘आयाराम-गयाराम’ चे प्रमाण अधिक होते. परिणामी भाजपा एकहाती सत्तेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
भाजपाने गेल्यावेळेपेक्षा ९ जागा अधिक मिळविल्या आहेत. शिवसेनेचे संख्याबळ गेल्यावेळेइतके कायम म्हणजे १४ एवढेच राहिले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फटका बसला आहे. राष्ट्रवादीचे ४ तर काँग्रेसचे ६ जागांचे नुकसान झाले आहे.
या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार हरीभाऊ जावळे, यांची कामगिरी लक्षणीय राहिली. खासदार रक्षा खडसे यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या २२जागा निवडून आल्या, याउलट खासदार ए.टी.पाटील यांच्या मतदारसंघात केवळ ११ जागा मिळाल्या. पाटील यांना स्वत:च्या पारोळा गावातही पं.स.त सत्ता आणता आलेली नाही. आमचार उन्मेष पाटील यांना पालिका निवडणुकीच्या यशाची पुनरावृत्ती करता आलेली नाही. पं.स.मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीत ‘टाय’ झाल्याने पेच निर्माण झाला आहे.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना मतदारसंघात जि.प.निवडणुकीत धक्का बसला असला तरी जळगाव व धरणगाव पं.स.मध्ये त्यांनी सेनेची सत्ता आणली आहे. आमदार किशोर पाटील यांनी जि.प. मध्ये चांगले यश मिळवले असले तरी पाचोरा पं.स.त भाजपाची सत्ता आली आहे तर भडगावमध्ये सेनेला यश मिळाले. आमदार चंद्रकांत सोनवणे या निवडणुकीत जबर धक्का बसला त्यांची भावजय पराभूत झाली. तर चोपड्यात सेनेचा दारुण पराभव झाला. पालिकेपाठोपाठ याही निवडणुकीत त्यांच्या पदरी अपयश आले आहे. पक्षातील मतभेदाचा फटका बसला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांना संमिश्र यश मिळाले. मतदारसंघात गटातील कामगिरी जेमतेम राहिली, एरंडोल पं.स.त पराभव झाला. पारोळा पं.स.मध्ये सत्ता मिळविली.
आमदार स्मिता वाघ व भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी अमळनेरात पालिका निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती टाळली. गटामध्ये बरोबरीत यश मिळविलेला पं.स.मध्ये सत्ता आणली.
काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. जि.प.त संख्याबळ ६ ने घटून केवळ ४ वर आले तर पं.स.मध्ये अवघ्या ६ जागा मिळाल्या. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्या चोपड्यात गटात केवळ एक जागा मिळाली तर पं.स.त भोपळा फोडता आलेला नाही. अमळनेर, जळगाव, धरणगाव या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या तालुक्यात पक्षाची कामगिरी वाईट आहे.

महाजनांचे नेतृत्व प्रभावी
विधान परिषद, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला यश मिळविण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मोलाचा वाटा आहे. नाशिकच्या महापालिकेची जबाबदारी सांभाळत त्यांनी जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले. मतभेदाचा परिणाम पक्ष व निवडणुकीवर होऊ दिला नाही.

Web Title: BJP's Yatmalik's hat-trick over marginalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.