मराठा आरक्षणासाठी आंदोलन : जळगावात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:12 PM2018-07-26T12:12:04+5:302018-07-26T12:14:40+5:30
सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २९ रोजी सकल मराठा समाजातर्फे काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
मुक्ताईनगर परिसरातील मराठा भवन येथे झालेल्या या बैठकीस मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष सुरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे अॅड.कुणाल पवार, अॅड.सचिन पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनपा निवडणुकीमुळे शांततेने आंदोलन
सध्या मराठा आरक्षणावरून राज्यभरात तणावाचे वातावरण आहे. सकल मराठा समाजातर्फे जळगावात देखील मंगळवारी शांततेत आंदोलन करण्यात आले. आता पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. जळगावात सध्या मनपाची निवडणूक आहे. त्यातच आंदोलन सुरु केल्यास त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता असल्याने पदाधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन करण्यात आले.
मुख्यमंत्री २९ रोजी प्रचारासाठी शहरात येणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २९ रोजी जळगावात प्रचारासाठी येत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी होत असलेल्या टाळाटाळच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विभागीय अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मराठवाड्याच्या बसफे-या दुपारपर्यंत रद्द
राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव आगारातून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी महामंडळाच्या सर्व फे-या बुधवारी दुपारपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. दुपारी साडेबारानंतर बसेस सुरु करण्यात आल्या. औरंगाबाद आगाराने राज्यातील सर्व आगारांना औरंगाबादला बसेस न पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जळगाव आगारासह इतर तालुक्यातील आगारांमधून औरंगाबादकडे जाणाºया सर्व बसेस २४ जुलै रोजी सकाळी दहानंतर रद्द करण्यात आल्या होत्या.
राज्यभर मराठा आंदोलन सुरु असल्याने जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. जळगाव शहरात मनपाची निवडणूक सुरु आहे, त्यासाठी बाहेरुन विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, नेते व मंत्री यांचे दौरे होत आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख लोकांना पोलीस संरक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना राजशिष्टाचारानुसार बंदोबस्त आहे. निवासस्थानी अतिरिक्त बंदोबस्त नाही.
-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक