एकनाथ खडसेंकडून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग; मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप
By Ajay.patil | Published: August 21, 2023 06:36 PM2023-08-21T18:36:57+5:302023-08-21T18:37:27+5:30
सत्तेत असो वा विरोधात, ब्लॅकमेलिंगची कामे सुरुच; गिरीश महाजनांचीही टीका
जळगाव - जिल्ह्यातील रस्त्यांचा कामांसाठी निधी जाहीर झाला असताना, भ्रष्टाचाराचा नावाखाली राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलींग करण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार कोटींचे कामं थांबली असल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला.
जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुर्नवर्सन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, मनपा आयुक्त विद्या गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीलाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रखडलेल्या कामांबाबत मंगेश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर कामांच्या मंजुरीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. मंजुरी योग्य असतानाही केवळ खडसेंनी भ्रष्टाचाराचा नावाखाली ही कामं थांबविण्याचा घाट घातला असून, त्यातून अधिकाऱ्यांची ब्लॅकमेलींग सुरु असल्याचे चव्हाणांनी सांगितले.
सत्ता असो वा विरोधात, खडसेंची ब्लॅकमेलींग सुरु - गिरीश महाजन
विकासाच्या कामात अडथळा आणण्याचे काम जुने असून, ते सत्तेत असतानाही ब्लॅकमेलींग करायचे आता सत्तेत नसतानाही त्यांची ब्लॅकमेलींग सुरु असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर केला. यासह बोरसे नामक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याला तब्बल २० वर्ष आपल्या घरी पोसला असल्याचाही आरोप गिरीश महाजन यांनी केला. दुसर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतांना आपण स्वत: किती शुध्द हे त्यांनी सांगावे असा टोलाही महाजन यांनी खडसेंना लगावला.