झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना
By अनिल गवई | Published: December 22, 2022 10:54 PM2022-12-22T22:54:00+5:302022-12-22T22:54:52+5:30
महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल
खामगाव: विश्वास संपादन करून झालेल्या चुकीचा गैरफायदा घेत महिलेकडून २२४.५ ग्रॅम सोने घेण्यात आले. तसेच तिची आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलींग करणाºया दोघांविरोधात खामगाव न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीमध्ये एका महिलेचा समावेश असून, या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव येथील तलाव रोडवरील गुंजन आतिश वर्मा (३२) या महिलेने न्यायालयात दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले की, रोशन राम बुधवाणी (५०, रा. बिलासपूर छत्तीसगड) आणि प्रियंका धीरज वर्मा (३०, रा. तलाव रोड, खामगाव) यांनी १० आॅक्टोबर १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून २२४.५ ग्रॅम सोने खरेदी केले. या व्यवहारादरम्यान फियार्दीकडून झालेल्या चुकीचा फायदा घेत, तिची ब्लॅकमेलींग करीत आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले.
याप्रकरणी न्याय मिळविण्यासाठी खामगाव न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावरील सुनावणी दरम्यान खामगाव न्यायालयाने महिलेची फसवणूक आणि ब्लॅकमेलींग करणाºयाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ७ डिसेंबर २२ रोजी दिले. या आदेशावरून खामगाव शहर पोलिसांनी अनुक्रमे रोशन राम बुधवाणी, प्रियंका धीरज शर्मा यांच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४२०, ३८३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक निलेश सरदार करीत आहेत.