मातीचे आशीर्वादच माणसाला मोठं करतात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:38 PM2017-10-22T23:38:03+5:302017-10-22T23:43:06+5:30
चाळीसगाव येथे रोटरी मिलेनियम आयोजीत सत्कार कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांनी रसिकांशी संवाद साधतांना हृद्य मनोगत व्यक्त केले.
लोकमत ऑनलाईन चाळीसगाव, दि.22 : मातीमध्ये एक अनामिक उर्जा असते. तिच्यात असणारे आशीर्वाद माणसाला सकस बनवितांना खूप मोठंही करतात. आपल्या मातीवर मनापासून प्रेम करा. अज्ञानी, अडाणी समाजामुळे अधोगती होते. जिथे संवाद असतो तिथे सुसंवादही घडतो. सुसंवादी समाज निर्माण करायचा असेल तर विचार सकारात्मक ठेवा. असा हृद्य संवाद साधतांना सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी रविवारची संध्याकाळ यादगार केली. सायंकाळी सहा वाजता रोटरी मिलेनियम आयोजित य.ना. चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या विविध क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व गाजविणा:या सहा चाळीसगावकरांचा गौरव त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार उन्मेष पाटील, यजुर्वेंद्र महाजन, माजी आमदार राजीव देशमुख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, डॉ. सुनिल राजपूत, मनिष शहा, रोटरी मिलेनियमचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र राजपूत, सचिव प्रमोद गुळेचा, अरुण निकम, प्राचार्य एस. आर. जाधव आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना अनासपुरे यांनी संत व ऐतिहासिक दाखले देत तात्पर्य असणा:या बोधपर कथाही ऐकवल्या. आग विझविणा:या चिमणीच्या गोष्टीतूनच नामचा जन्म झाला. भाषा माणसाला समृद्ध करतात. लौकीक आणि अलौकीकत्वाचे धागे गुंफूनच परमेश्वराने माणसे घडवली. वेगळं काही तरी करणारी माणसं गावाचा गौरव असतात. समाजमाध्यमाचा उपयोग संवादी प्रक्रियेसाठी जास्त होणे गरजेचे आहे. असा मोकळा संवाद साधतांना मकरंद अनासपुरे यांनी खास मराठवाडय़ाच्या रसाळ बोली भाषेतील विनोदी किस्सेही ऐकवले. सणांना उत्सवी व बाजारु रुप देऊ नका. त्यामुळे त्यातील भाव कमी होतो. असे आवाहनही त्यांनी केले. आयुष्यात शॉर्टकट नसतो. फोकस्ड असणारे ध्येयवेडे तरुणच यशस्वी होतात. त्यामुळे प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवा. जे काही कराल ते समाजपयोगी करा असा सक्सेस मंत्र यजुर्वेंद्र महाजन यांनी आपल्या मनोगतात दिला. राजीव देशमुख, उन्मेष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. शैलेंद्र राजपूत यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप जैन व छाया महाले यांनी केले. आभार प्रमोद गुळेचा यांनी मानले.