आईच्या आशीर्वादानेच पोलीस प्रशासनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 11:38 AM2017-05-14T11:38:21+5:302017-05-14T11:38:21+5:30
आईनेदेखील प्रोत्साहन व आशीर्वादही दिले. त्यामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो
सुनील पाटील / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 - पोलीस प्रशासनात उच्चपदस्थ अधिकारी व्हावे ही माझी इच्छा तर होतीच, त्यासाठी आईनेदेखील प्रोत्साहन व आशीर्वादही दिले. त्यामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आईबाबत बोलताना सांगितले. सोबतच त्यांनी लहानपणापासूनचे अनुभवदेखील सांगितले.
मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना दत्तात्रय कराळे म्हणाले की, आईच्या हातचा खूप मार खाल्ला, मात्र तितकेच तिने लाडही केले. आईची जागा अन्य कोणीही घेवू शकत नाही. आज पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत असलो तरी आजही आईचा धाक व भीती कायम आहे, मात्र ती आदरयुक्त! आजही महत्वाचा अथवा कोणताही निर्णय घ्यायचा असला तरी आईला विचारल्याशिवाय घेण्याची हिंमत होत नाही.
बालपणी बोट धरुन चालविण्यापासून तर शिक्षण, संस्कार याची शिदोरी आईकडूनच मिळाली. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यार्पयत ती मुलांची काळजी घेते. घरात किंवा बाहेर अनेक चुका झाल्या असतील तर तिने त्या पोटात घातल्या. चांगल्या कामासाठी ती सदैव खंबीरपणे पाठीशी उभी राहते. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना कितीही थकली, दमली असली तरी शालेय जीवनात दररोज शाळेत जाण्यापासून घरचा अभ्यास सातत्याने करुन घेण्यात ती कधीही विसरली नाही. मुलांनी मोठं व्हाव हीच तिचा इच्छा. मात्र मी देखील तिच्या इच्छेविरुध्द कधी गेलो नाही, आणि भविष्यातही जाण्याची हिंमत नाही. कमलचा मुलगा दत्तू.अशी लहानपणी माझी ओळख होती व ती आजही कायम आहे, फक्त त्यात पोलीस अधिकारी हा शब्द पुढे लागला आहे.