मुख्य सुत्रधारांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको!

By विजय.सैतवाल | Published: July 8, 2023 03:50 PM2023-07-08T15:50:03+5:302023-07-08T15:50:16+5:30

जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पोहचले व त्यांनी मध्यस्थी करीत रास्ता रोको मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

Block the way for the demand to file crimes against the main facilitators! | मुख्य सुत्रधारांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको!

मुख्य सुत्रधारांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको!

googlenewsNext

जळगाव : एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथे शुक्रवारी झालेल्या नामदेव उर्फ रावण अशोक कोळी (२५) या तरुणाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका तरुणाच्या नातेवाईक व गावकऱ्यांनी शनिवारी सकाळी घेतली. या मागणीसाठी जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर रास्ता रोको केला. 

या वेळी रुग्णालयात मोठा गोंधळ झाला. जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पोहचले व त्यांनी मध्यस्थी करीत रास्ता रोको मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. रंवजे बुद्रुक येथे दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून वाद होऊन शुक्रवारी   नामदेव उर्फ रावण अशोक कोळी (२५) या तरुणाला मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. 

शनिवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार होता. या साठी सकाळी सात वाजताच मयताचे नातेवाईक व गावातील अनेक नागरिक रुग्णालयात पोहचले. मात्र या प्रकरणात मुख्य आरोपींना वगळण्यात आले असून जो पर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे या ठिकाणी गोंधळ वाढत गेला. मागणी मान्य होत नसल्याने नातेवाईक व ग्रामस्थ थेट रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर आले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्या वेळी जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या मागणीवर ठाम राहिले.  

पोलिस अधीक्षकांनी दिले आश्वासन
या विषयी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयी सूचना देत या प्रकरणी चौकशी करून जे आरोपी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले. या विषयी जिल्हा पेठ पोलिसांनी आंदोलकांना माहिती दिली. त्या वेळी त्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. 

गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा
पोलिस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे तर घेतला मात्र जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कायम ठेवत रुग्णालय परिसरात नातेवाईक थांबून होते. घटना एरंडोल पोलिस ठाण्यांतर्गत असल्याने तेथे गुन्हा दाखल होईल, असे सांगण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे बराच वेळ गोंधळ सुरू होता. पोलिस अधीक्षकांनी आश्वासन दिले असल्याने गुन्हा दाखल होईल, असे पुन्हा पोलिसांनी सांगितले व नातेवाईक शांत झाले. त्यानंतर एरंडोल पोलिस ठाण्याचे अधिकारीदेखील रुग्णालयात पोहचले. त्यानंतर ११ वाजता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

कुटुबीयांना अश्रू अनावर
या गोंधळादरम्यान आपले म्हणणे मांडत असताना नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. रुग्णालयात मयताचे आई-वडील, भाऊ, मावशी व इतर नातेवाईक थांबून होते. 

फिर्यादीला धमकी दिल्याचा आरोप
घटनेनंतर रंवजे बुद्रुक येथे या प्रकरणातील आरोपींनी फिर्यादी, मयताचा भाऊ सुभाष अशोक कोळी याला शुक्रवारी संध्याकाळी घरी जाऊन फिर्याद मागे घे, अन्यथा तुला या पेक्षा वाईट पद्धतीने मारू, अशी धमकी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. 

वाहतुकीचा खोळंबा
सकाळी रुग्णालयासमोर अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर नातेवाईकांनी तो रवंजे बुद्रुक येथे नेला व तेथे दुपारी एक वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी एरंडोल पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह दंगा नियंत्रक पथकदेखील तैनात होते.

दोन जण ताब्यात, अन्य आरोपींचा शोध
नातेवाईकांच्या मागणीनुसार या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले असून इतर काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
 

Web Title: Block the way for the demand to file crimes against the main facilitators!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव