पारोळा शहरात सर्वत्र नाकेबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 03:03 PM2020-04-01T15:03:54+5:302020-04-01T15:05:04+5:30
पारोळा शहरातील गावात येणारे सर्व रस्ते लाकडी दांड्याने बांधून नाकेबंदी करण्यात आली आहे.
पारोळा, जि.जळगाव : कोरोना रोखण्यासाठी घरात राहण्यापेक्षा अनेक जण गावात फिरताना जास्त दिसत आहे. अशा परिस्थितीत पारोळा शहरातील गावात येणारे सर्व रस्ते लाकडी दांड्याने बांधून नाकेबंदी करण्यात आली आहे. ओळखपत्र वा ओळखीशिवाय गावात प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे अनेकांना शिस्त लागणार आहे.
नगराध्यक्ष करण पवार, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे व आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान यांनी याबाबत निर्णय घेत ही नाकेबंदीची मोहीम शहरात राबविली जात असल्याचे सांगितले.
फक्त अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील लोकांना गावात प्रवेश मिळणार आहे. तेही पालिकेने दिलेल्या ओळखपत्रावर शहरात प्रवेश राहणार आहे. एकही मोटारसायकल, चारचाकीला गावात प्रवेश राहणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, पोलीस व्हॅन, अधिकारी वर्ग यांच्या वाहनांसाठी कजगाव चौफुली, पीर दरवाजा, तलाव गल्लीतून गावात प्रवेशासाठी मार्ग तोही संवेदनशील अत्यावशक सेवेसाठी चालू राहणार आहे.
शहरात शनी मंदिर दरवाजा, झपाट भवानी दरवाजा, मांतग दरवाजा, शिवाजी महाराज पुतळा जवळील दरवाजा, बसस्थानकावर जवळील बोगदा, दिल्ली दरवाजा, धरणगाव चौफुली दरवाजा अशी सर्व शहरात प्रवेशद्वाराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
त्यामुळे आता शहरात या नाकेबंदीवर पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. कोणालाही विनाकारण गावात प्रवेशापासून रोखण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद करण्यात येणार आहे व विनाकारण फिरणाºयावर मग येथूनच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.