देवतांच्या नावाने शोषण करणाऱ्यांना आळा घालणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 03:58 PM2019-11-12T15:58:06+5:302019-11-12T16:00:00+5:30
‘देवदेवतांच्या नावाने शोषण करणाºया व्यवस्थेला आळा घालणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन करणे होय.’
अमळनेर, जि.जळगाव : ‘देवदेवतांच्या नावाने शोषण करणाºया व्यवस्थेला आळा घालणे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन करणे होय,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
येथील जी.एस.हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या प्रेरणादीप व्याख्यानमालेत ‘मंतरलेली अंधश्रद्धा’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार स्मिता वाघ व जी.एस.हायस्कूलचे चेअरमन योगेश मुंदडा, सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंचचे संस्थापक सदस्य डी.ए.धनगर, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे आदी विचारमंचवर उपस्थित होते.
अविनाश पाटील पुढे म्हणाले, मंतरलेली अंधश्रद्धा म्हणजे मंत्र मारलेली किंवा भारावलेली, एखाद्या गोष्टीने प्रभावित केलेली श्रद्धा होय. श्रध्दा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करता आली तर तो विश्वास होतो, तर अंधश्रद्धा निर्र्मूलन करणे म्हणजे आधुनिक विचारांनी जगणे शिकणे होय. माणसाचा विवेक उन्नत करते ती 'श्रद्धा' व विवेक अवनत करते ती अंधश्रद्धा होय. काल्पनिक गोष्टीचं अधिष्ठान देऊन सामान्यांचं शोषण करण्याला आमचा विरोध आहे. अनुकरणातून अंधश्रद्धा बळावत असते. त्यात महिलांच्या अंधश्रद्धा ह्या पराकोटीच्या असतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रातही मंतरलेली अंधश्रद्धा आहे.अंधश्रद्धेत धर्माची जोड दिली जाते तर अंधश्रद्धा निर्मूलनात धर्माला स्थान नाही. म्हणून जनमानसातील अंधश्रद्धेला तिलांजली दिली पाहिजे.
मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा वक्त्यांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात उत्कृष्ट शाळा म्हणून विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे प्राचार्य एस.यु.पाटील, चंद्रकांत पाटील, विजयसिंग पवार, वसुंधरा लांडगे, प्रा.विलास पाटील, प्रा.रवींद्र माळी, रवींद्र पाटील, हेमकांत लोहार, डॉ.शरद पाटील यांचा समावेश होता.
प्रास्ताविक डी.ए.धनगर यांनी केले. वक्त्यांंचा परिचय विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केले.