रक्तपेढ्या ऑक्सिजनवर,चार दिवस पुरेल ऐवढाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:32+5:302021-04-04T04:16:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याने, याचा शहरातील रक्तपेढीवर मोठा परिणाम झाला आहे. ...

Blood bank oxygen, enough stock for four days | रक्तपेढ्या ऑक्सिजनवर,चार दिवस पुरेल ऐवढाच साठा

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर,चार दिवस पुरेल ऐवढाच साठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याने, याचा शहरातील रक्तपेढीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या तर लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने रक्ताचा अधिकच तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रक्तपेढ्या ऑक्सिजनवर असून,चार दिवस पुरेल एवढाच साठा असल्याचे रक्तपेढ्यांतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जळगाव शहरात शासकीय रक्तपेढीसह तीन खाजगी रक्तपेढ्या आहेत. कोरोनापूर्वी या रक्तपेढ्यांमध्ये दर आठवड्याला १०० ते १२५ बाटल्यांचे रक्त संकलन केले जायचे. रक्त संकलनासाठी दर आठवड्याला विविध सामाजिक संस्थांतर्फे शिबिरे घेतली जात होती. यातून मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध होत होता. तसेच काही नागरिक स्वतः रक्तपेढीत जाऊन रक्तदान करत होते. त्यामुळे जिल्ह्याभरात कधीही रक्ताचा तुटवडा जाणवत नव्हता. मात्र, आता कोरोनामुळे रक्तपेढी चालकांना शिबिरे घेता येत नसल्याने आणि दुसरीकडे नागरिक कोरोनाच्या भीतीने रक्तदान करणे टाळत असल्यामुळे सध्या शहरातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये येत्या काही दिवसात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील शासकीय रक्तपेढीतही चारच दिवसांचा रक्तसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. रक्ताच्या या तुटवड्यामुळे थॅलेसिमिया आजारातील बालकांना रक्त पुरवठ्याबाबत मोठे आवाहन निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

रेड प्लस ब्लड बँकेत एका दिवसाचाच साठा

शहरातील रेड प्लस ब्लड बँकेतही कोरोनामुळे रक्त साठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे रक्त संकलनाचे प्रमाण तीस टक्क्यांवर आले असून, सध्या रेड प्लस बँकेत फक्त आठ बाटल्या रक्त शिल्लक आहे.त्यामुळे हा एक दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याचे डॉक्टर भरत गायकवाड यांनी सांगितले.

इन्फो :

माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी

या रक्तपेढीतही सध्या विविध ग्रुपच्या मोजक्याच रक्त पिशव्या शिल्लक आहेत. कोरोनापूर्वी दर आठवड्याला ५० ते ६० पिशव्या रक्त संकलन व्हायचे. येणाऱ्या प्रत्येकाला रक्त उपलब्ध करून दिले जायचे.मात्र, कोरोनामुळे रक्त संकलनाचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके झाले आहे. त्यामुळे सध्या २० पिशव्या रक्त साठा शिल्लक असून, हा रक्तसाठा दोनच दिवसांचा असल्याचे माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीतर्फे अर्जुन राठोड यांनी सांगितले.

रेडक्रॉस रक्तपेढी

रेडक्रॉस तर्फे कोरोना पूर्वी दर आठवड्याला विविध ठिकाणी होणाऱ्या शिबिरांमध्ये २०० ते २५० रक्त पिशव्यांचे रक्त संकलन व्हायचे. मात्र,आता कोरोनामुळे हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आले असल्याचे रेडक्रॉस रक्त पेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले. सध्या कोरोना काळात रेडक्रॉसकडे ३० टक्केच रक्तसाठा असून, लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे भविष्यात अधिकच रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहनही डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

इन्फो :

शासकीय रक्तपेढीतही चार दिवसांचा रक्तसाठा

येथील शासकीय रक्तपेढीतही कोरोनापूर्वी दर आठवड्याला १०० ते १२५ पिशव्यांचे रक्त संकलन व्हायचे. रक्त संकलनासाठी शाळा, महाविद्यालय व विविध सामाजिक संस्थातर्फे आयोजित कार्यक्रमात रक्त संकलनासाठी शिबिरे घेतली जायची.मात्र, आता कोरोनामुळे शिबिरे घेता येत नसल्याने,परिणामी रक्त संकलनावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या रक्त संकलनाचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांपर्यंत आले आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या या कठीण काळात शासकीय रक्तपेढीतही चार दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे डॉ. आकाश चौधरी यांनी सांगितले.

इन्फो :

लसीकरणा आधी करा रक्तदान

कोरोना पासून बचावासाठी शासनातर्फे कोरोना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मात्र, लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्त दात्यांना रक्तदान करता येणार नाही. तर लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही पुन्हा २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात रक्त पेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई अधिकच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन रक्त पेढी चालकांतर्फे करण्यात येत आहे.

Web Title: Blood bank oxygen, enough stock for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.