सासरच्या मंडळीकडून जावयाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:46 PM2019-04-26T12:46:59+5:302019-04-26T12:47:28+5:30
बॅटरी स्फोटाचा बनाव
जळगाव : सासरच्या मंडळीने मुलाची गोळी झाडून हत्या केलेली आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे दिलेले असतानाही अमळनेर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप मृत योगेश सुरेश कुमावत (औरंगाबाद) याची आई मंगलाबाई कुमावत व इतर नातेवाईकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
नातेवईकांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील योगेश कुमावत या युवकाचा अमळनेर मधील मुंदडा नगरातील माधुरी उदेवाल हिच्याशी २३ आॅगस्ट २०१८ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर पती-पत्नीत खटके उडायला लागले. त्यामुळे माधुरी ही ६५ हजार रुपये घेवून माहेरी निघून आली होती. त्यानंतर तिने दोन लाख रुपये देवून वाद मिटवून टाका असे सांगितले होते. त्यानुसार योगेश २६ सप्टेंबर रोजी दीड लाख रुपये घेवून अमळनेर येथे आला होता. योगेश हा माधुरी हिच्या घरी पोहचला की नाही हे विचारण्यासाठी योगेशची आई मंगलाबाई यांनी माधुरी हिची आई अमृता उदेवाल यांच्याशी फोनवर संपर्क केला असता, त्यांनी तुमचा मुलगा जीवंत येणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर रात्री १ वाजता योगेशचा भाऊ महेश याच्या मोबाईलवर फोन करून योगेश याने माधुरी हिला दोन गोळया तर स्वताला एक गोळी मारली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर योगेशच्या कुटुंबिय व नातेवाईकांनी अमळनेर येथे धाव घेतली असता त्याला धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने तो बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. गंभीर जखमी असल्याने योगेश याला मुंबई येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असतांना ७ रोजी त्याचा मृत्यू झाला होता.
बॅटरी स्फोटाचा बनाव
युवतीच्या कुटुंबियांनी बॅटरीचा स्फोट झाल्याचा बनाव करून आमची मुलगीही जखमी झाल्याचे सांगितले होते. .मुंबईमध्ये उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. दरम्यान, योगेश जखमी असतांना व मयत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी वारंवार अमळनेर पोलीसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. उलट पोलीसांनी योगेश याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता.
सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश
योगेशच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. त्यांनी अमळनेर पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. तरी देखील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आल्याने योगेशच्या कुटुंबियांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. सुनावणीअंती न्या.टी.व्ही नलावडे व न्या.मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने माधुरी योगेश कुमावत, अमृता उदेवाल, बळवंत उदेवाल, नंदीनी उदेवाल, गिरीष उदेवाल, महेश कुमावत, रेणुका कुमावत या सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पत्रकार परिषदेला मयत योगेशची आई मंगलाबाई कुमावत, मावशी भारती कुमावत, मावसे ज्ञानेश्वर कुमावत, समाजअध्यक्ष संजय बेलदार, महेंद्र बोरसे उपस्थित होते.
नातेवाईक आज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेले आहेत. त्यांची फिर्याद घेऊन संशयित लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला जात आहे. -अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक, अमळनेर