एकात्मतेच्या दर्शनातून जपलं रक्ताचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:58+5:302021-07-12T04:11:58+5:30
फोटो नंबर : १२ सीटीआर १५, १४ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महायज्ञात रविवारी राष्ट्रवादीचे ...
फोटो नंबर : १२ सीटीआर १५, १४
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महायज्ञात रविवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ.अब्दुल गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ डॉ.अब्दुल गफ्फार मलिक फाउंडेशन व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिपेठ भागात भव्य रक्तदान शिबिर पार पडले. भर पावसात दात्यांनी पुढाकार घेत ५०५ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले. या एकोप्यातून या ठिकाणी रक्ताचं नातं जपण्यात आलं. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी या शिबिराला भेट देत सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.
सैय्यद शाहीद सैय्यद नवाब यांनी सकाळी सात वाजताच येऊन रक्तदान शिबिराचा प्रारंभ केला. तरुणांनीही यात मोठा उत्साह दाखवून स्वत: रक्तदान केले. त्यानंतर सकाळी १० वाजेपासून मोठ्या प्रमाणात दात्यांनी शिबिराच्या ठिकाणी येत रक्तदान केले. या शिबिराला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, लोकमतचे कार्यकारी संपादक रवी टाले, साहाय्यक महाव्यवस्थापक गाैरव रस्तोगी, राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, राष्ट्रवादीचे विनोद देशमुख, अशोक लाडवंजारी, सुनील माळी आदींनी भेटी दिल्या.
भर पावसात प्रतिसाद
शिबिराला सुरुवात झाल्यानंतर काही वेळेनंतर पावसाला सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी थांबून रक्तदान केले. आयोजकांतर्फे नावनोंदणी, रक्तदान आणि बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. सकाळी सात वाजेपासून सुरु झालेले हे शिबिर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होते.
तीन रक्तपेढ्यांकडून स्वतंत्र व्यवस्था
या शिबिरातील सहभागी दात्यांची संख्या लक्षात घेता शिबिराच्या ठिकाणी रेडक्रॉस रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, रेड प्लस रक्तपेढीकडून रक्तसंकलन करण्यात आले. या तिन्ही रक्तपेढ्यांनी स्वतंत्र टेबल लावत नियोजन केले. शिबिरात जळगाव शहरातील विविध भागातील तरुणांचा उत्साह सर्वाधिक होता. बहुतांश तरुण स्वत: वजन करून रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत होते. यावेळी नगरसेवक चेतन सनकत, झैद नदीम मलिक, वसीम रझा रफीक शेख यांनी रक्तदान केले.
प्रारंभी रेडक्रॉस सोसायटीचे मानद सचिव विनोद बियाणी, अनिल भोळे, सुभाष सांखला, एजाज मलीक, वहाब मलिक, नदीम मलिक, रहिम मलिक, मोहम्मद शफी शेख कादर, शेख उस्मान, तन्वीर शेख, सईद सैय्यद, दानियाल शेख, याकूब खान आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी केले शिबिराचे कौतुक
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सायंकाळी या रक्तदान शिबिराला भेट देऊन आयोजनाबाबत लोकमतसह आयोजक एजाज मलीक यांचे कौतुक केले. रक्तदात्यांचे त्यांनी आभारही मानले. दरम्यान, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापाैर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी आमदार मनीष जैन, नगरसेवक भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक शरद तायडे, रेडक्रॅासचे उपाध्यक्ष गनी मेमन, भैय्यासाहेब मुंदळा, माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार, एटीएमचे सचिव आमीन बादलीवाला व एटीएमचे उपाध्यक्ष सय्यद शान, डॉक्टर सेलचे अध्यक्ष एस. आर. पाटील, अशोक पाटील, सलीम इनामदार, भूषण बोलतानी, अन्वर मुलतानी, डॉ.मिनाज पटेल, शनिपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल ससे आदींनी या शिबिराला भेट दिली.