भुसावळला पुन्हा उगवली रक्ताळलेली पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:15+5:302021-07-17T04:14:15+5:30

भुसावळ : नेहमीच गुन्हेगारीच्या बाबतीत चर्चेत असलेल्या भुसावळ शहरात लाॅकडाऊनच्या काळातही खुनाची मालिका थांबण्याचे नाव घेईना. ...

Bloody dawn has risen again in Bhusawal | भुसावळला पुन्हा उगवली रक्ताळलेली पहाट

भुसावळला पुन्हा उगवली रक्ताळलेली पहाट

Next

भुसावळ : नेहमीच गुन्हेगारीच्या बाबतीत चर्चेत असलेल्या भुसावळ शहरात लाॅकडाऊनच्या काळातही खुनाची मालिका थांबण्याचे नाव घेईना. काही दिवस शहर शांत होत नाही तोवर पुन्हा शहरात ३५ वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी गजानन महाराज मंदिराजवळ उघडकीस आली. सचिन ज्ञानदेव भगत (३५) असे मयताचे नाव असून ऑगस्ट २०२० ते जुलै २०२१ या वर्षभराच्या कालावधीत आतापर्यंत बाजार पेठ पोलीस स्टेशन हद्दीत चार, शहर हद्दीत चार, तर तालुका हद्दीत एक असे नऊ खून झालेले आहेत.

जंक्शन ओळख असलेल्या या शहरामध्ये कधी घरफोडी, कधी धूम स्टाइल सोनसाखळी लांबवणे, तर कधी गंभीर स्वरूपाचे खुनाचे प्रकार हे सातत्याने घडताना दिसत आहे. वर्षभरात झालेल्या खुनाच्या घटनेतील सर्व आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सचिन ज्ञानदेव भगत (३५) हा एका बाळू मंत्री नामक सट्टा लावणाऱ्या व्यक्तीकडे कामाला होता. रात्री दहा वाजता त्यास फोन आला व त्यानंतर सकाळी खुनाची बातमी सगळ्यांसमोर आली, नेमके मध्यरात्री काय झाले? कोणासोबत बोलणे झाले? कशावरून वाद झाला? यामागचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शनिवारी सकाळी खून झाल्याची माहिती समोर येताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली, श्वान पथकाला याठिकाणी पाचारण करण्यात आले. मात्र, तेही घटनास्थळी काही वेळ घुरमटले. अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची वार्ता पसरल्यानंतर व ओळख पटावी याकरिता सोशल मीडियावर घटना व्हायरल झाल्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास मयताची आई आल्याने ओळख पटली. दगडासारख्या वस्तूने वार केल्याचा संशय असल्याने त्यादृष्टीने फोरेन्सिक पथकाला याठिकाणी पाचारण करण्यात आले होते.

कुटुंब पडले उघड्यावर

दरम्यान मयत सचिन यांच्या पश्चात बारा वर्षांचा मुलगा, नऊ वर्षांची मुलगी, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे, भाऊ हरीश भगत याच्या म्हणण्यानुसार पूर्वी मुन्ना चौधरी नामक व्यक्तीशी त्याचे भांडण झाले होते. त्यावेळी त्याच्या डोक्याला तीक्ष्ण हत्याराने दुखापत करण्यात आली होती. तर पोलीस कोणत्या दिशेने तपास करतील व आरोपीस किती वेळात ताब्यात घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ऑगस्ट २०२० ते जुलै २०२१ यादरम्यान झालेले खून बाजारपेठ हद्द

१) २५/८ /२०२० मयताचे नाव : विलास दिनकर चौधरी (३२). ठिकाण - श्रीरामनगर, भुसावळ. कारण:- पूर्ववैमनस्यातून. यातील पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात. २) १३/९/२०२० मयताचे नाव : अल्तमश रशीद शेख (१९). खुनाची घटना- खडका चौफुली ब्रिज. कारण- जुन्या भांडणावरून. या गुन्ह्यातील पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

३) ११/१०/२०२० मोहम्मद कैफ (१७). पंचशीलनगर भुसावळ. कारण:- मागील भांडणावरून. या घटनेतील पाचही आरोपी ताब्यात.

४) १६/७/२०२१ सचिन ज्ञानदेव भगत(३५). श्रद्धानगर, जामनेर रोड, गजानन महाराज मंदिराजवळ, भुसावळ. कारण:- अद्याप स्पष्ट नाही. आरोपींचा तपास सुरू आहे. शहर पोलीस ठाणे हद्द.

१) २४/११/२०२० मयताचे नाव राजू शामराव मिरटकर(२८). ठिकाण : यावल नाका झोपडपट्टी. कारण:- पैशाच्या कारणाने. आरोपी-दोन अटकेत.

२) १३/४/२०२१ मयताचे नाव संदीप एकनाथ गायकवाड (३४). ठिकाण- लिंपस क्लबजवळील हनुमान मंदिराजवळ. कारण- बाचाबाची झाल्याने. या घटनेतील तिघेही आरोपी अटकेत.

३) ७/५/२०२१ नाव सुनील अरुण इंगळे (३०). खुनाचे ठिकाण- आगवाली चाळ भागात, प्रताप मशिदीजवळ. कारण:- किरकोळ वादातून. घटनेतील दोन्ही आरोपी ताब्यात.

४) २/६/२०२१ मयताचे नाव द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे (७७). खुनाचे ठिकाण- कोटेचा शाळेच्या प्रवेशद्वारासमोर, शांतीनगर. कारण:- कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा केला खून. आरोपी महिला अटकेत. तालुका पोलीस ठाणे.

१) १३/६/२०२१ भांडणात जखमी झाल्याने उपचार घेताना नीलेश बळीराम सोनवणे हे मयत झाले. घटना साकेगाव गांधी चौकात घडली. कारण- दोन गटांतील वाद.

आतापर्यंतच्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही

वर्षभरात झालेल्या या आधीच्या एकूण आठ खुनांमधील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, ही विशेष बाब होय. आताची १६ जुलैची घटना सोडल्यास सर्व आरोपी ताब्यात आहेत.

Web Title: Bloody dawn has risen again in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.