जळगावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 06:53 PM2018-09-01T18:53:47+5:302018-09-01T18:54:30+5:30
चोरीचे सत्र सुरुच
जळगाव : शहरात आदर्श नगरातील मकरा पार्कमध्ये दोन ठिकाणी तर समता नगरात एक अशा तीन ठिकाणी एकाच रात्री घरफोड्या झाल्याच्या घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्या. समता नगरात विमलबाई सोनार (वय ७०) यांच्या बंद घरात खिडकीची जाळी काढून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा अडीच लाखाच्यावर मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.
सोन्याच्या बांगड्यावअंगठ्यालांबविल्या
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, समता नगरात विमलबाई सोनार या एकट्या राहतात. मध्यरात्री चोरट्यांनी खिडकीची जाळी उचकवून विमलबाई यांच्या घरात प्रवेश केला. सुटकेसमध्ये ठेवलेले ७ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, ७ ग्रॅमची अंगठी व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी व ३५ हजार रुपये रोख काढून घेत चोरट्यांनी ही सुटकेस बाहेरच्या खोलीत फेकून दिली होती. विमलबाई सकाळी उठल्या असता त्यांना सुटकेस बाहेर व उघडी दिसली. घरातील अन्य वस्तूही त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विमलबाई यांचे नातेवाईक संजय सोनार यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे, ज्ञानेश्वर कोळी, वासुदेव मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आदर्श नगरात चोरटे रिकाम्या हाताने फिरले माघारी
आदर्श नगरातील मकरा पार्कमध्ये अनिल रत्नाकर शिंदे व कैलास रामदास पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्ही घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.अनिल शिंदे हे पुणे येथे कैलास पाटील हे अष्टविनायक दर्शनाला गेलेले आहेत. दोन्ही कुटुंब परिवारासह बाहेरगावी असल्याने घरांना कुलूप होते. सकाळी संजय चव्हाण यांना शिंदे यांच्या घराचा दरवाजा उघडा व कुलुप तुटलेले दिसल्याने त्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. घरात रोकड किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, चव्हाण यांनीच रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
चोरी व घरफोडीचे सत्र सुरुच
शहरात चोरी व घरफोडीचे सत्र सुरुच आहे. त्याशिवाय दुचाकी व कार चोरीचेही प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात ११ ते २० आॅगस्ट या दहा दिवसात दहा घरफोड्या झाल्या होत्या. त्यानंतरही चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या. वाढत्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तीन घटना घडल्या.