खळाळ !

By admin | Published: June 10, 2017 04:54 PM2017-06-10T16:54:42+5:302017-06-10T16:54:42+5:30

आम्हाला ज्या पंचवटी हॉटेलमध्ये सोडण्यास रिक्षावाल्या चाचांना सांगितले ते शहरातले हॉटेल होते!

Blush! | खळाळ !

खळाळ !

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 - मी हिंदीतून चौकशी करत असताना इंगळे या भल्या पोलिसाने  मध्येच थांबवले आणि म्हणाला - ‘मी भुसावळचाच आहे. आपण मराठीत बोलू!’ त्यांनी चहा देत आदरातिथ्य केले. आमचे महेश्वरला येणे ही त्याने आपली जबाबदारी मानली. तोर्पयत त्यांनी कोणालातरी पाठवून रिक्षा मागवली होती. दरम्यान राहण्यासाठीच्या हॉटलेचे बजेट विचारून घेतले होते.  आम्हाला ज्या पंचवटी हॉटेलमध्ये सोडण्यास रिक्षावाल्या चाचांना सांगितले ते शहरातले  हॉटेल होते! नंतर पोहचल्यावर रिक्षावाल्या रेहमान चाचांनी पैसे घेण्यास नकार दिला. ‘आप साबके मेहमान हो, वो खफा होंगे।’ हे त्यांने लॉजिक. आम्ही बळजबरी पैसे दिले.
शहरात केवळ 2-3 रिक्षाच दिसल्या. वखवख आणि समाधान यातील फरक मध्यप्रदेशात जागोजागी आढळतो. एका खानावळीत दुपारचे जेवलो भरपेट. कारण अन्नाची चव. तिथल्या राजेश नावाच्या प्रतिनिधीने पापड नाहीत असे मोठा अपराध समजत मिठाई आणून दिली. 180 रु. बिल देताना  लक्षात आले होते त्याने  मागवलेली रबडी तशीच दिली होती.
नर्मदा मैया  लवकर दर्शन  देत नाही. मुख्य प्रवेशद्वारापासून पोहोचेर्पयत अर्धा तास लागतो आणि नंतरच ती पूर्ण दिसते आणि आपण सारा थकवा विसरतो. अतिशय सुंदर घाट आहे नर्मदेचा. मागे काळ्या दगडातील रेखीव आणि नजरबंद करणारे स्थापत्य असलेली मंदिरे मध्ये हा ‘पुण्यश्लोक’ घाट आणि पुढे तो शतकान्शतकाचा वाहता सततचा खळाळ. मनोरम, प्रसन्न जागा. लांब तिकडच्या काठावर गर्द वनराई! या जागी पंडे नाहीत. फेरीवाले नाहीत. घाण? नाही.. आवाज नाही.  मुख्य म्हणजे ते भयंकर असे घाटावरचे क्रिया - कर्म करण्यास संपूर्ण बंदी! अद्भूत जागा आहे. पवित्र. काही गोष्टी केवळ अनुभवण्यासाठीच्या असतात. त्यांच्यासाठी समर्पक शब्दच नसतात.
शहरही तसेच. पवित्र, स्वच्छ.  जागोजागी गर्द वृक्ष आणि ठिकठिकाणी काळे-शार रांजण आणि त्यात पिण्यास गार पाणी असलेले ही नागरिकांनी आपणहून स्वीकारलेली आणि धर्म म्हणून पाळलेली जबाबदारीे हे सहजी कळते. ‘मला वरती गेल्यावर उत्तर द्यायचे आहे, मला प्रजा - दक्ष राहून सत्याने राज्य कारभार करावा लागेल’ असे त्या पुण्यवान राणीने नुसतेच लिहून ठेवलेले नाही तर तसेच केले आहे. अहिल्या देवींचा पुतळा, स्मारक, तसबीरी, चौकाला नाव असे मला कोठेच काही आढळले नाही. फार स्वच्छ आणि आत्यंतिक पारदर्शी आणि प्रामाणिक विचार गाव मोठा करतो हा बोध माहेश्वरी झाला. जे पाण्याचे ग्लास होते ते स्टीलचे होते आणि त्यांना चेनने बांधून ठेवलेले नव्हते.
त्या अजिबातच येणे - जाणे नसलेल्या गल्लीतून जाण्याची वेळ आली त्याला कारण म्हणजे नेहमीच्या वाटेवर कापून ठेवलेले झाड तर त्या गल्लीतून दुकानात गेलो आणि वस्तू घेऊन दुपारी 3 च्या सुमारास  पहिल्यांदाच अवचित असा बहावा दिसला. पिवळ्या फुलांचा, झोकदार, संपूर्ण फुललेला.  आश्चर्यचकीत झालो. हा  गेल्या एका तपापासून  येथेच असताना आधी का नाही भेटला? गल्ली बदलली म्हणून? महेश्वरला गेलो होतो आम्ही तिघे, एका आठवडय़ापूर्वी. तिथे अशी अनेक आश्चर्ये अवचित भेटली! संपूर्ण अजनबी असे आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा काहीही माहिती आणि कोणाचीही ओळख नव्हती. आधी सुरक्षित हॉटेल हवे.  नेहमी अशा प्रसंगी पोलिसाची मदत घेतो.
महेश्वरी साडय़ांचे वर्णन करण्यापेक्षा त्या तेथून आणणे अधिक श्रेयस्कर आणि मोठय़ा आकर्षणाचे. एक मात्र सांगतो - निवड करणे फार फार कठीण आहे. छान सजवलेले असे ते अख्खे दुकानच घेऊन जावेसे वाटते.
महेश्वरी आणखीन एका कारणासाठी जावे म्हणजे जावेच. तेथे गेल्या कित्येक वर्षापासून नव्हे तर शतकांपासून सतत तेवते असे नंदादीप. ते एका मंदिरात आहेत. स्पष्ट दिसतात. आपण जर नास्तिक असू तरी ते अतिशय सुबक असे वरती पिवळी ज्योत असलेले दीप, नमस्कार करायलाच लावतात. तेथील एका तेज पुंज स्वामींचे स्केच पार्थने न सांगता केले. त्यांना दिले त्यांनी पार्थला मोठय़ा प्रेमाने बघितले आणि आशीर्वाद दिला. म्हणाले, ‘यह मै मेरे गुरुजीने दि हुई गीताके किताब में रख्खुंगा - वो मेरे आखरी सांसतक साथ मे रहनेवाली है।’ हा आशीर्वाद महेश्वरचा होता आणि तो पार्थ के साथ, उसके आखरी सांसतक रहनेवाला है।
आपण महेश्वरला  गेला असाल तर आपला आनंद माहिती आहे पण जे नाही गेलेत त्यांनी जरा गल्लीबदल करावा. मळलेला रस्ता सोडून वेगळी पायवाट धरावी. मग ठायी - ठायी, अमलताश पहावे. अवचित भेटणारे, फोटोत ते दिसतात तो नेहमीचा परिपाठ - जरा प्रत्यक्षालाही लाईक ठोकावेत ..
- प्रदीप रस्से 

Web Title: Blush!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.