जळगाव पीपल्स बँक संचालक मंडळ बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:15 AM2021-04-25T04:15:11+5:302021-04-25T04:15:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२१- २०२६ या कालावधीची निवडणूक बिनविरोध झाली असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२१- २०२६ या कालावधीची निवडणूक बिनविरोध झाली असून, या विषयीची घोषणा शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली.
जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने जिल्हा उपनिबंधक सांगली यांच्याकडून संचालक मंडळाची निवडणूक जाहीर करण्यात आली होते.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर २७ सभासदांनी नामनिर्देशन अर्ज घेतले होते. त्यापैकी २४ जणांनी अर्ज दाखल केले. यात ६ एप्रिल रोजी छाननीमध्ये नऊ जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले व एका उमेदवाराने माघार घेतली. १५ एप्रिल रोजी माघारीनंतर १४ अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे १४ जागांसाठी १४ अर्ज असल्याने सर्व सदस्य बिनविरोध ठरले.
निवडणुकीचा हा निकाल जाहीर करण्यासाठी बँकेची शनिवारी सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. करे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. या ऑनलाइन सभेमध्ये ६०० पेक्षा जास्त सभासद सहभागी झाले होते.
यांची झाली बिनविरोध निवड
भालचंद्र प्रभाकर पाटील, प्रकाश मांगीलाल कोठारी, चंद्रकांत बळीराम चौधरी, सुनील प्रभाकर पाटील, रामेश्वर आनंदराम जाखेटे, प्रवीण वासुदेव खडके, ज्ञानेश्वर एकनाथ मोराणकर, अनिकेत भालचंद्र पाटील, चंदन सुधाकर अत्तरदे, विलास चुडामण बोरोले, सुहास बाबूराव महाजन, स्मिता प्रकाश पाटील, सुरेखा विलास चौधरी, राजेश धिरजलाल परमार.
३० रोजी चेअरमन निवड
बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमधून ३० एप्रिल रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड केली जाणार आहे. यासाठी संचालक मंडळाची पहिली सभा ३० रोजी होणार आहे. दरम्यान, संचालक मंडळ बिनविरोध निवड झाल्याने चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडदेखील बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.