जळगावात पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा पाचव्या दिवशी सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:34 PM2018-08-21T12:34:56+5:302018-08-21T12:35:37+5:30
असोदा शिवारात आढळला मृतदेह
जळगाव : संततधार पावसामुळे लवकी नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या हेमंत अरुण वाणी (वय ३५, रा.श्री लक्ष्मी नारायण नगर) या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी आठ वाजता असोदा शिवारात नाल्याच्या काठावर आढळून आला. गुरुवार,१६ रोजी दुपारी ३.४५ वाजता अयोध्या नगरातील लक्ष्मी नारायण नगरातील नाल्यात तोल जावून पडल्याने हेमंत वाहून गेला होता.
दरम्यान, चार दिवस मनपाच्या आपात्कलीन विभागाने शोध घेतल्यानंतर देखील हेमंत चा मृतदेह हाती न लागल्याने रविवारी शोध मोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला होता. अखेरीस सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हेमंतचा मृतदेह असोदा शिवारात आढळून आला.
मदतीला धावून जाणारा म्हणून ओळख
हेमंत हा गरजुंच्या मदतीला धावून जात असे. कोणाशीही त्याचे वैर नव्हते. अजातशत्रू अशी त्याची ओळख होती. हेमंत ज्या पुलावरुन नाल्यात पडला, त्याच पुलावर या घटनेच्या आधी गाय पडली होती, तेव्हा हेमंत यानेच या गायीला पाण्यातून काढून जीवनदान दिले. तसेच अनेक लहान मुलांना त्याने नाल्याच्या काठावरुन दुसऱ्या दिशेला सुखरुप हलविले होते.
मृतदेह आणण्यासाठी मदत मिळेना...
सकाळी आठ वाजता मृतदेह आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णवाहिका व शववाहिका चालकांच्या विनवण्या केल्या, मात्र मृतदेह कुजलेला असल्याने अनेक रुग्ण व शववाहिका चालकांनी असोदा येथे येण्यास नकार दिला. शेवटी आमदार सुरेश भोळे यांच्या एका कार्यकर्त्याने विनंती करुन रुग्णवाहिका चालकास येण्यास राजी केले.
त्यानंतर साडे बारा वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. आपत्कालिन स्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक करुन वारेमाप पैसे घेणाºया रुग्णवाहिका व शववाहिका चालकांच्या माणुसकी शून्य कारभाराने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.