बेपत्ता झालेल्या भावंडांचे मृतदेह आढळले विहिरीत, चुलत काका ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:32 PM2021-10-28T22:32:02+5:302021-10-28T22:32:55+5:30
दोन्ही बालकांचा मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी जळगाव येथील रहिवासी असलेल्या बालकांच्या चुलत काकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
जळगाव: यावल तालुक्यातील चुंचाळे येथे बुधवारी दुपारी शेतातून बेपत्ता झालेल्या भावंडांचे मृतदेह, गुरुवारी दुपारी शेतातील विहिरीत आढळून आले. ऐन दीपावलीच्या तोंडावरच एका गरीब कुटुंबातील दोन दीपक विझल्याच्या घटनेने संपूर्ण गावच सुन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी बालकांच्या चुलत काकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हितेश रवींद्र सावळे (६)वर्ष व रितेश रवींद्र सावळे(५), अशी या मृत बालकांची नावे होती. रितेश हा इयत्ता पहिली तर रितेश अंगणवाडीचा विद्यार्थी होता.
चुंचाळे येथील रवींद्र सावळे व उज्वला सावळे हे दाम्पत्य शेती करते. बुधवारी ज्वारीची कापणी करण्यासाठी दोन्ही मुले हितेश व रितेश यांना घेऊन ते शेतात गेले होते. मुलांना त्यांनी लिंबाच्या झाडाखाली थांबायला सांगितले. दुपारी १ वाजता हे दाम्पत्य जेवणासाठी मुलांना बोलावण्यास गेले असता दोन्ही मुले दिसली नाहीत. याबाबत रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर, गुरुवारी दुपारी या बालकांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले. मुलांचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी एकच टाहो फोडला.
घातपाताचा संशय -
दोन्ही बालकांचा मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी जळगाव येथील रहिवासी असलेल्या बालकांच्या चुलत काकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी दिवसभर हा पस्तीस वर्षीय इसम शेतातच होता. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बारेला यांनी शवविच्छेदन केले. यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.