नवजात अर्भकांचे शव उघड्यावर, जळगाव जिल्हा रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:32 PM2018-05-09T12:32:55+5:302018-05-09T12:32:55+5:30
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - प्रसूतीदरम्यान मयत झालेल्या महिलेसह नवजात जुळ््या बालकांना जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर या ठिकाणी नवजात बालकांचे शव तब्बल चार तास उघड्यावरच ठेवण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी जिल्हा रुग्णालयात घडला. महिलेचे शवविच्छेदन झाल्यानंतर या बालकांचेही शव नातेवाईकांनी गावी नेले. दरम्यान, तिघांनाही मृतावस्थेत आणल्याने बालकांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले व तेच हे शव घेऊन तेथे थांबले होते, असे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.
चोपडा तालुक्यातील मालापूर येथील नवीबाई फरजा पावरा (२६) या महिलेला मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार महिलेला खाजगी रुग्णालयात हलविले व तेथे तिची प्रसूती होऊन जुळे मुले झाले. मात्र याच दरम्यान नवजात बालक दगावले व महिलेची प्रकृती अधिक खालावल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. येथे आणताना तिचा वाटेतच मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात महिलेचे शव ठेवण्यात आले. मात्र नवजात बालकांचे शव घेऊन नातेवाईक बाहेरच बसलेले होते. ते रुग्णालयात न ठेवल्याने दुपारी चार वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत या बालकांचे शव एका गोधडीत उघड्यावरच होते.
या संदर्भात या ठिकाणी जमलेल्या काही नागरिकांनी या प्रकाराचा निषेध करीत संताप व्यक्त केला.
महिलेला मृतावस्थेच जिल्हा रुग्णालयात आणल्याने येथे तिचे शवविच्छेदन करण्यात आले. बालकांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले होते. ते महिलेचे शवविच्छेदन होईपर्यंत बालकांचे शव घेऊन थांबले होते.
- डॉ. प्रवीण पाटील, वैद्यकीय अधिकारी.