रशियात बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले, अमळनेरच्या भाऊ-बहिणीला शोधण्यात ‘माॅस्को’च्या पथकाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 07:56 AM2024-06-09T07:56:04+5:302024-06-09T07:56:44+5:30
Jalgaon News: रशिया देशातील यारोस्लाव-द-वाइज नोव्हगो रोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.
जळगाव - रशिया देशातील यारोस्लाव-द-वाइज नोव्हगो रोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. वोल्खोव्ह नदीच्या प्रवाहात बुडालेल्या पाचपैकी एक विद्यार्थिनी बचावली असून, भडगावच्या एकाचा तर अमळनेरच्या भाऊ-बहिणीचा मृतदेह भारतात पाठविण्यासाठी तातडीने पृर्तता केली जात असल्याची माहिती तेथील दूतावासातील अधिकारी कुमार गौरव यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शनिवारी सकाळी कळविली.
मंगळवारी रात्री वोल्खोव्ह नदीच्या प्रवाहात पाच जण बुडाले होते. त्यात जळगावच्या हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) तिघांसह मलिक गुलामगोलस मोहम्मद याकूब (२०, मुंबई) व निशा भूपेश सोनवणे (२०, धुळे, हल्ली रा. पुणे) यांचा समावेश होता. निशा काही तासांतच बेशुद्ध अवस्थेत हाती लागली होती. ती शुद्धीवर आली असताना घटनेच्या दुसऱ्यादिवशी हर्षलचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले होते. जिशान व जिया या भाऊ-बहिणीचे मृतदेह शनिवारी हाती लागले.
दूतावासाकडून पाठपुरावा
आंतरराष्ट्रीय संहिता पार पाडल्यानंतर मृतदेह भारतात आणण्यासाठी परवानगी मिळणार आहे. त्यामुळे कुमार गौरव व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद केंद्रीय पातळीवर ही संहिता तातडीने पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. भारताचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांसह विद्यापीठासोबत समन्वयासह अन्य प्रक्रिया पूर्ण करीत असल्याचे दूतावास कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.