बोदवडमध्ये १२ लाखांच्या नाला खोलीकरणावर एका पावसाने फिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:18 PM2020-06-14T17:18:19+5:302020-06-14T17:19:25+5:30
शहरातील नाल्याच्या खोलीकरणासाठी नगरपंचायतीने १२ लाख रुपये खर्च केले. मात्र शनिवारी पहिला पाऊस पडल्यानंतर याच नाल्याचे पाणी नेहमीप्रमाणे नाला परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसले.
बोदवड, जि.जळगाव : शहरातील नाल्याच्या खोलीकरणासाठी नगरपंचायतीने १२ लाख रुपये खर्च केले. मात्र शनिवारी पहिला पाऊस पडल्यानंतर याच नाल्याचे पाणी नेहमीप्रमाणे नाला परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसले. यामुळे १२ लाखांच्या नाला खोलीकरणावर एकाच पावसाने पाणी फिरल्याचे म्हटले जात आहे.
शहरातून पंजाब जिनिंग ते हिरवा तलाव, शिवद्वार पूल, प्रभाग क्रमांक सहाचा पूल, कुरेशी वाडा, भीमनगर परिसर, नेरकर कॉलनी व शेवटी दत्त कॉलनी परिसराच्या पुढे वाहत जाणारा नाला असून, या नाल्यावरच गत दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निधीतून १२ बांध करण्यात आले होते. तर याच नाल्यावर गत वर्षी नगरपंचायतीकडून सुमारे १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून नाल्याचा शहरातून जाणारा भाग व नाला खोलीकरण, दुरुस्तीकरणाची निविदा काढण्यात आली होती.
भुसावळ येथील ठेकेदाराने या नाल्याचे खोलीकरण तसेच दुरुस्तीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यात काही ठिकाणी नाला खोल करण्यात आला होता, तर इतर ठिकाणी मात्र नाला तसाच सोडून देण्यात आल्याने काम तसेच पडले आहे. वर्ष उलटत आले. तरी या प्रभाग क्रमांक सहामध्ये पूर्णपणे खोलीकरण झाले नाही. तसेच शिवद्वाराजवळच्या जवळील नाल्याचे काम झाले नसल्याने या नाल्यात मोठी झाडी झुडपे वाढली आहेत. पूर्ण पावसाचे पाणी या नाल्यात अडकून पडत आहे.
पावसाळ्यात नेरकर कॉलनी तसेच भीमनगरच्या नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना खोलीकरण न झाल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागते. नगरपंचायतीकडून या नाल्याचे काम घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण चौकशी केल्याशिवाय ठेकेदाराला बिलही देण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
सदर १२ लाख रुपयांचे काम कोणत्या ठिकाणी झाले हेच आता दिसेनासे झाले आहे.
याबाबत भीमनगर परिसरात राहणारे सुरेश तायडे यांची प्रतिक्रिया घेतली असता सदर पावसाळ्यात नाल्याच्या खोलीकरण न झाल्यामुळे आम्हाला अडचणीला सामोरे जावे लागत असून, ही समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नगरपंचायतीचे आरोग्याधिकारी अमित कोलते यांच्याशी संपर्क साधला असता जा कामाचे निरीक्षण केल्याशिवाय बिल अदा केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सदर काम घेणाºया कंपनीला सूचनाही दिली असल्याचे त्यांनी नमूद केले.