सफाई कर्मचाऱ्याचा मृतदेह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:20 PM2021-01-13T16:20:37+5:302021-01-13T16:21:07+5:30

कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृतदेह संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच आणला. त्यामुळे चाळीसगाव नगर परिषदेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

The body of the cleaner was found in the chief minister's office | सफाई कर्मचाऱ्याचा मृतदेह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात

सफाई कर्मचाऱ्याचा मृतदेह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात

googlenewsNext
ठळक मुद्देचाळीसगावातील घटना : पात्र सफाई कर्मचाऱ्यांच्या यादीत नाव नसल्याने बसला धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पात्र यादीत नाव न आल्याचा धक्का बसल्याने बापू त्र्यंबक जाधव (५५) या स्वच्छता कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आणला. यामुळे बुधवारी सकाळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. 

दरम्यान, वारसांना नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याहस्ते दोन लाखाच्या मदतीचा धनादेश देण्यात आल्यानंतर अत्यंविधी करण्यात आला.

पालिकेत रोजंदारीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे शासन स्तरावरुन समावेश होत आहे. चाळीसगाव पालिकेत एकूण १८९ रोजंदारी स्वच्छता कर्मचारी आहेत. यापैकी २६ कर्मचाऱ्यांचे पात्र म्हणून समावेशन झाले आहे. २२ कर्मचाऱ्यांचे पालिका स्तरावर तर चार कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरावर समावेशन केले गेले आहे. उर्वरीत १५३ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांकडून नगरपरिषद संचालनायाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे

यादी पाहिली आणि धक्का बसला

मृत जाधव हे गेल्या चाळीस वर्षापासून पालिकेत रोजंदारी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत होते. मंगळवारी समावेशन झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची राज्यस्तरावरील यादी लावण्यात आली. यादीत नाव नसल्याने त्यांना धक्का बसला. बुधवारी सकाळी ते काम करीत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

मृतदेह आणला पालिकेत

समावेशन करताना शैक्षणिक पात्रतेचा निकष असून शिक्षण चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जाधव हे अशिक्षित असल्याने त्यांचे समावेशन पात्र यादीत झालेले नाही. याचाच धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांचा मृतदेह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आणला. यावेळी कर्मचाऱ्यांनी मृत कर्मचाऱ्याच्या वारसास नोकरी व तातडीची पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली. कर्मचारी अडीच तास पालिकेत ठाण मांडून होते.

दोन लाखाची मिळाली मदत

घटनेचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी मध्यस्थी करीत दोन लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला. मदतीचा धनादेश मृत कर्मचारी शोभाबाई जाधव हिच्याकडे सुपूर्द केला. जाधव यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. 

सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन करा

यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पात्र म्हणून समावेशन करावे. शासन स्तरावर उर्वरीत कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव त्वरीत पाठवावा. जाचक शैक्षणिक अट रद्द करण्याची मागणी रामचंद्र जाधव यांच्यासह गौतम जाधव, बबलू जाधव आदिंनी केली.

रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी यापूर्वीच शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. जाधव यांच्या परिवारास तातडीची दोन लाखांची मदत देण्यात आली.

-आशालता चव्हाण, नगराध्यक्षा, चाळीसगाव. 

रोजंदारी स्वच्छता कर्मचारी अत्यंत कमी मानधनात सेवा बजावत आहे. त्यामुळे शासनाने त्यांचे समावेशन सरसकट करावे. शिक्षणाची अट रद्द करावी. मृत कर्मचाऱ्याच्या वारसाला पालिकेत नोकरी द्यावी.

- रामचंद्र जाधव, नगरसेवक, चाळीसगाव. 

Web Title: The body of the cleaner was found in the chief minister's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.