तापी नदीत शेतकऱ्याचा मृतदेह तरंगताना आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 01:48 PM2020-12-07T13:48:32+5:302020-12-07T13:49:02+5:30
धुरखेडा येथील तापी नदीच्या काठावर एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : तालुक्यातील धुरखेडा येथील तापी नदीच्या काठावर एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. अखेर मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले शेतकरी देविदास राजाराम बोदडे ( ५२) यांचा तो मृतदेह असल्याची ओळख त्यांच्या शोधात असलेल्या नातेवाईकांना पटली. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील धुरखेडा येथील तापी नदीकाठी एका अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याची खबर संबंधित पोलीस पाटील यांनी रावेर पोलिसात दिली. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पो. हे. काॅ. जितेंद्र नारेकर, पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो. कॉ. म्हस्के आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी धुरखेडा येथील मच्छीमारीचा व्यवसाय असलेले ज्ञानेश्वर बेलदार व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत मृतदेह बाहेर काढला.
नातेवाईक आले धावून
दरम्यान, संबंधित पोलीस पाटील व पोलीसांनी नदीकाठच्या गावात व्हाॅट्सअप ग्रुपवर फोटाे व माहिती टाकली असता मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील तीन दिवसांपासून घराबाहेर निघून गेलेल्या शेतकर्याच्या शोधात असलेले त्यांचे भाऊ व मुले घटनास्थळी धावतच आले. त्यांना मृतदेहाची ओळख पटली, त्यांनी एकच आक्रोश केला.
बेलसवाडी येथील शेतकरी देविदास राजाराम बोद हे ४ डिसेंबर रोजी दुपारी शेतीकाम आटोपून घरी आले असता त्यांनी घरात रेशनचे धान्य आणले व सायंकाळी बाहेरून फिरून येतो, असे सांगितले होते. दरम्यान ते घरी न परतल्याने त्यांचा शौचविधीसाठी गेल्याने पाय निसटून तापीनदीत बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांच्या आप्तेष्टांकडून वर्तवण्यात येत आहे.
गत तीन दिवसांपासून मयत देविदास राजाराम बोदडे यांचा मृतदेह तापी नदीत बुडून तरंगत धुरखेडा येथील तापीनदी तीरावर येईपर्यंत तीन दिवसात पाण्यात फुगून छिन्न विच्छिन्न झाल्याने रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले.
याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र नारेकर हे करीत आहेत.