मोहाडी येथे विहिरीत आढळला वाकडीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 05:30 PM2019-03-28T17:30:57+5:302019-03-28T17:31:35+5:30

डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची जखम

The body of a gram panchayat member of the Kadadi was found in well in Mohadi | मोहाडी येथे विहिरीत आढळला वाकडीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह

मोहाडी येथे विहिरीत आढळला वाकडीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह

Next

कु-हाड, ता. पाचोरा - येथून जवळच असलेल्या साजगाव ते मोहाडी रस्त्यावर असलेल्या विहिरीमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह वाकडी, ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे हे १९ मार्चपासून बेपत्ता होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वरजवळील पिंप्री धरणामध्येही शोध घेण्यात आला होता. त्या वेळी मानवी शरीराचे अवशेष आढळून आले होते. मात्र ते कोणाचे होते, ते स्पष्ट झाले नव्हते. या तपास सुरू असताना बुधवारी संध्याकाळी साजगाव ते मोहाडी रस्त्यावर धरणाच्यावरील बाजूस असलेल्या विहिरीमध्ये एक मृतदेह असल्याचे समोर आले. रमेश रामसिंग पाटील हे शेतकरी दहा दिवसांनी, २७ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीतून पाणी काढून ते रोपांना देत असताना त्यांना विहिरीत हात-पाय बांधलेला मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ मोहाडी येथे पोलीस पाटील विजय पवार यांना या बाबत माहिती दिली. पवार यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारा पोलीस औट पोस्टला घटना कळविली व पोलीस घटनास्थळी हजर झाले. मात्र रात्र झाल्याने मृतदेह काढणे शक्य नव्हते. त्या मुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह
गुरुवारी सकाळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, पहूर पो.स्टे.चे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ, पिंपळगाव पो.स्टे.चे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासमोर गावकऱ्यांच्या सहकार्याने मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. मृतदेह दोघे हात-पाय बांधून व दोन मोठे वजनदार दगड बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मयताच्या डोक्यावर धारदार शस्राने वारदेखील केलेले होते. मृतदेह पाण्याने फुगून वर आला होता व दुर्गंधी पसरली होती.
नातेवाईकांनी ओळख पटविली
वाकडी येथील ग्रा.पं.सदस्य विनोद चांदणे यांचे वर्णनासारखाच मृतदेह असल्याने पोलिसांनी मयताचे भाऊ व नातेवाईकांना गुरुवारी सकाळी घटनास्थळी बोलविले. त्यांनी मयताच्या कपड्यांवरुन मृतदेहाची ओळख पटविली. त्या वेळी सदर मृतदेह विनोद चांदणे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव हेदेखील उपस्थित होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. मृतदेह काढला त्या वेळी घटनास्थळी जळगाव येथून मागविण्यात आलेली आरसीपी प्लाटूनची तुकडी बंदोबस्त ठेवून होती.

Web Title: The body of a gram panchayat member of the Kadadi was found in well in Mohadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव