१५ तासानंतर सापडला बुडालेला मुलाचा मृतदेह; कुटुंबीयांचा आक्रोश
By सुनील पाटील | Published: July 17, 2022 05:10 PM2022-07-17T17:10:40+5:302022-07-17T17:11:30+5:30
Jalgaon : मुलाचा मृतदेह पाहून आई, वडील व भावाने एकच आक्रोश केला. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
जळगाव : भोकणी शिवारातील गिरणा नदीपात्रात पोहताना बुडालेल्या विशाल हिलाल जोहरे (वय १६, रा.शिवाजी नगर) या मुलाचा मृतदेह तब्बल १५ तासांनी रविवारी सकाळी साडे सहा वाजता सापडला. मुलाचा मृतदेह पाहून आई, वडील व भावाने एकच आक्रोश केला. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शनिवारी दुपारी यश पप्पु भालेराव (वय १४), प्रेम परशुराम झांझळ (वय १५), मुयर संतोष सपकाळे (वय १५) व विशाल हिलाल जोहरे (वय १६) असे चौघे धरणगाव तालुक्यातील भोकणी गावाजवळ गिरणा नदीत पोहायला गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघे जण बुडाले होते. गावकऱ्यांनी नदीपात्रात धाव घेऊन तिघांना सुखरुप बाहेर काढले होते, परंतु विशाल हाती लागला नव्हता. अंधारामुळे रात्री शोध मोहीत थांबविण्यात आली होती.
रविवारी सकाळी साडे सहा वाजता विशालचा मृतदेह आढळून आला. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल फेगडे, पोलीस नाईक दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय य रुग्णालयात आणला.शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. विशाल हा नुतन मराठा शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई अनिता, वडील हिरालाल सुरेश जोहरे, मोठे भाऊ बबलू आणि सोनू, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.