वाळूच्या खड्डय़ाने घेतला दोनगावच्या तरुणाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:16 PM2017-09-03T12:16:19+5:302017-09-03T12:17:32+5:30
फुपनगरी येथील घटना : गिरणा नदीच्या डोहात बुडाला तरुण
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - तालुक्यातील फुपनगरी येथे गिरणा नदीत बुडाल्याने गुलाब यशवंत पाटील (वय 40, रा.दोनगाव, ता.धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडली. गुलाब ज्या ठिकाणी बुडाला त्या ठिकाणी वाळू उपशामुळे मोठा खड्डा पडला होता, त्याचा अंदाज न आल्याने तो तोल जाऊन खड्डयात कोसळला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही धानोरा नदी पात्रात वाळूच्या खड्डयात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
फुपनगरी व दोनगाव या दोन्ही गावांच्या मधोमध गिरणा नदी आहे. शेतात तसेच दोन्ही गावात जाण्यासाठी नागरिक या नदीतूनच वापरतात. गुलाब पाटील व त्याचा परिवार शनिवारी नदीकाठी दुस:याच्या शेतात मुंगाच्या शेंगा तोडण्यासाठी आले होते. हे काम सुरु असताना गुलाब हा फुपनगरी गावात आला होता. तेथून परत जात असताना नदीत पाण्यामुळे खड्डयाचा अंदाज न आल्याने गुलाब पाण्यात बुडाला.
नदीत वाळूचे काम करणा:या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुलाब याला पाण्यातून बाहेर काढले, मात्र तो तेव्हा मृत झाला होता. ओळख पटत नसल्याने अडचण झाली होती.वडनगरीचे पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी जावून मृतदेहाबाबत तालुका पोलिसांना माहिती दिली. हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बोरसे व जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील गावांमधील लोकांना बोलावले असता मयत हा दोनगावचा असल्याची ओळख पटली. दोन तासांनी ओळख पटल्यावर नातेवाईक व गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ओळख पटल्यानंतर गुलाब याच्या भावाने नदी पात्रात धाव घेतली. मृतदेह ट्रॅक्टरमध्ये टाकत असताना भावाने एकच हंबरडा फोडला. सायंकाळी आठ वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथे नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, गुलाब पाटील यांच्या पश्चात प}ी, दोन मुले, भाऊ व आई, वडील होते.