भोगावती नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:44 PM2021-03-11T23:44:12+5:302021-03-11T23:44:33+5:30
विजय एकनाथ माळी (२८) या तरुणाचा भोगावती नदीपात्रात मृतदेह आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरणगाव : शहरातील नारीमळ्यातील रहिवासी असलेल्या विजय एकनाथ माळी (२८) या तरुणाचा भोगावती नदीपात्रात मृतदेह आढळून आला.
शहरातील नारीमळा चांभारवाड्यातील रहिवासी विजय एकनाथ माळी (२८) हा तरुण मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कामावर जातो व रात्री १० वाजेपर्यंत घरी परत येतो. मात्र तो बुधवारच्या दुपारपर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या आई-वडिलांना काळजी वाटली. तो हरविल्याबाबत पोलीस स्टेशनला खबर देण्यासाठी ते बसस्थानक चौकात आले होते, त्या वेळी त्यांना ओळखीच्या व्यक्तीकडून तुमचा मुलगा रिक्षात बसून कामावर जात असल्याचे सांगितल्याने ते घरी परत आले. नंतर थोड्या वेळाने मयत विजयचा चुलत भाऊ बळीराम माळी यांच्या मोबाइलवर त्यांच्या मित्राने संपर्क साधून तुझा भाऊ आठवडे बाजाराजवळील पुलाजवळ मृत अवस्थेत पडलेला असल्याची खबर दिली. लागलीच त्याचे नातलग घटनास्थळी खात्री करण्यासाठी गेले असता त्या मृतदेहाच्या शरीरावरील खुणा, उजव्या हातावर विजय नाव असे गोंदलेले होते. त्यावरून मयताची ओळख पटली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
मयत विजय हा घरात एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे आई-वडिलांनी हंबरडा फोडला. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला बळीराम विश्वनाथ माळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पो. हे. कॉ. मजहर पठाण, नागेंद्र तायडे हे करीत आहेत.