भुसावळ येथे बोगी व शुध्द जलनिर्मिती प्रकल्पांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:43 PM2018-09-20T12:43:36+5:302018-09-20T12:47:30+5:30
डीआरएम आर.के. यादव यांची ‘लोकमत’ भेटीत माहिती
जळगाव : रेल्वेच्या माध्यमातून भुसावळ येथे ४०० कोटींचा आधुनिक बोगी निर्मिती कारखाना व रेल शुद्ध जल निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे मंडल रेल्वे प्रबंधक (डीआरएम) आर. के. यादव यांनी दिली.
‘लोकमत’ शहर कार्यालयास त्यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी केले. यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक (डीसीएम) सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडळ अभियंता उत्तर विभाग ( डिईएन) दीपक कुमार, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी उपस्थित होते.
२०० एक्सप्रेस व ८० मालगाड्या
यावेळी माहिती देताना यादव म्हणाले, रेल्वेमार्गावरील भुसावळ विभाग हा सर्वांत मोठा विभाग असून, इगतपुरीपासून ते अमरावती व मध्यप्रदेशातील खंडवापर्यंतचा भाग भुसावळ विभागात येतो. एकूण १२ जिल्ह्यातील लहान-मोठ्या रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत २४ तासांत या मार्गावर विविध ठिकाणी जाणाऱ्या २०० प्रवासी व ८० मालगाड्या धावतात. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भुसावळ विभागात गेल्या वर्षी ६ ठिकाणचे गेट बंद करून या ठिकाणी भुयारी बोगदे तयार केले आहेत. भविष्यात याचप्रमाणे २५ ठिकाणचे रेल्वे गेट बंद केले जातील.
२२ स्टेशनवरील फलाटांची उंची वाढणार
काही ठिकणी रेल्वे फलाट आणि रेल्वेच्या दरवाजा पर्यंतची उंची जास्त असल्यामुळे अपघात होत असतात. यासाठी भुसावळ विभागात येणाºया २२ स्टेशनवरील फलाटांची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे.
आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
रेल्वे स्टेशन व परिसरातील सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. साधारणत: एक किलोमीटर पर्यंत त्या व्यक्तीची हालचाल यामध्ये कैद होतील. नाशिक, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ व बडनेरा या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भुसावळला १०८ कॅमेरे बसविले आहेत.
दोन मोठे प्रकल्प
भुसावळ येथे येत्या काळात ४०० कोटी रुपये खर्च करून आधुनिक बोगी निर्मितीचा कारखाना उभारला जाईल तसेच ‘रेल जल’ हा शुद्ध बाटलीबंद पाणी निर्मितीचा कारखानाही होणार आहे.
मॉडेल स्टेशनवर वायफाय सुविधा सुरू
जळगाव-भुसावळ दरम्यान तिसरी लाईन पूर्ण, चौथ्या लाईनचे काम भूसंपादनाच्या अडचणीमुळे स्वत:च्या जागेतच काम करणार
भविष्यात मनमाड व त्यानंतर इगतपुरी तसेच दौडपर्यंत तिहेरी लाईन झाल्यावर गाड्यांची संख्या वाढणार
चाळीसगाव- धुळे मार्गावर इलेक्ट्रीक इंजिनचा वापर सुरू झाल्याने व ट्रॅकच्या सुधारणेने वेग मर्यादा ताशी ६० वरून १०० कि.मी. केली जाणार
नवीन शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामासाठी १५ आॅक्टोपरपासून जुना पूल पाडण्यास प्रारंभ होणार
भुसावळ विभागात सरकते जिने, लिफ्ट, रेस्टॉरंट, फलाटांची लांबी वाढविणे, छत उभारणे अशी कामे सुरु आहेत.
सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून जळगाव रेल्वे स्टेशनचे सुुशोभिकरण प्रस्तावित