जळगाव जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांनी बोगस नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:09 PM2020-01-29T12:09:19+5:302020-01-29T12:09:58+5:30
शिक्षण उपसंचालक चौकशीसाठी जळगावात
जळगाव- पाचोरा, चाळीसगाव, अमळनेरातील काही शाळांमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या बनावट स्वाक्षºया करून नियुक्त्या दिल्या संदर्भातील तक्रारींवर चौकशी करण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव हे मंगळवारी जळगावात दाखल झाले़ त्यांनी दिवसभर माध्यमिक विभागात कागदपत्रांची तपासणी केली़ ते पुढील पाच दिवस जिल्ह्यातच थांबून आहे़
१३ आॅगस्ट २०१५ ते ३१ मे २०१९ या कालावधीत देविदास महाजन हे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते़ त्या काळात पाचोरा, अमळनेर व चाळीसगाव येथील काही शाळांमधील संस्थाचालकांनी बोगस संचमान्यता बनवून कर्मचाºयांना नियुक्त्या दिल्या़ त्यानंतर नाशिक विभागात शालार्थसाठी प्रस्ताव पाठविले़ मात्र, योगायोगाने महाजन यांची नाशिक येथेच बदली झाली असल्यामुळे महाजन यांना जळगाव जिल्ह्यातून आलेले शालार्थसाठीचे प्रस्ताव पाहणीत आल्यानंतर त्यावर त्यांच्या बनावट स्कॅन केलेली सही दिसून आली़ नंतर त्यांनी नाशिक शिक्षण उपसंचालक यांच्याकडे महाजन यांनी बनावट सही व बोगस नियुक्त्या केल्या संदर्भात पाचोरा येथील पीक़े़विद्यालय, अमळनेर येथील जय योगेश्वर विद्यालय तसेच श्री साई समर्थ मा़ विद्यालय पथराड, चाळीसगाव तालुक्यातील मा़वि़हातले, मा़वि़ मुंदखेडे या शाळांविरूध्द तक्रार केली होती़
मंत्रालयात पोहोचले प्रकरण
माध्यमिक शिक्षणाधिकाºयांची बनावट सही करून शालार्थसाठी प्रस्ताव पाठविल्याचे प्रकरण मंत्रालयात पोहोचल्यानंतर संबंधित प्रकरणातील तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले़ त्यानंतर नाशिक विभागाचे उपसंचालक नितीन बच्छाव, तसेच तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्यासह कर्मचारी मंगळवारी सकाळी चौकशीसाठी जळगाव जि़प़ शिक्षण विभागात धडकले़ दुपारी १२ वाजेपासून आवक-जावक क्रमांक, नियुक्ती कागदपत्रे, तसेच इतर कागपत्रांची तपासणी करण्यात आली़ शिक्षण उपसंचालकांनी माध्यमिक शिक्षण विभागात पाच तास ठाणमांडून संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केली़ यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़जे़पाटील यांची उपस्थिती होती़ त्यातच उपसंचालकांनी बोगस नियुक्त्याप्रकरणी समिती नेमण्याच्या सूचना केल्या आहेत़
जिल्ह्यात उपसंचालक ठाणमांडून
ज्या शाळांविरूध्द तक्रार करण्यात आली, त्यांच्या चौकशीसाठी पाच दिवस उपसचांलक हे जळगाव जिल्ह्यात ठाणमांडून असणार आहे़ दरम्यान, बुधवारी अमळनेर येथील शाळेची चौकशी होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ तर दोन कर्मचारी जि़प़ शिक्षण विभागात थांबतील, असेही त्यांनी सांगितले़ जर बोगस भरती आढळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या असल्याचे सूत्रांकडून कळते़