पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम, 12 डॉक्टर्सना नोटीस
By admin | Published: April 17, 2017 04:30 PM2017-04-17T16:30:27+5:302017-04-17T16:30:27+5:30
शासकीय निकषानुसार पथकाने ग्रामीण भागातील 50 डॉक्टरांची तपासणी केली
पाचोरा, जि. जळगाव, दि. 17 - पाचोरा शहर व तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहिम शासनाच्या आदेशानुसार सुरू असून शासकीय निकषानुसार पथकाने ग्रामीण भागातील 50 डॉक्टरांची तपासणी केली. यापैकी 12 जणांच्या त्रुटी आढळल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी त्यांना नोटीस बजावल्या आहेत.
वैद्यकीय सेवेसंदर्भात ठरवून दिलेल्या निकषानुसार डीएचएमएस, बीएचएमएस डॉक्टरांना होमिओपॅथीचीच प्रॅक्टीस करणे गरजेचे असते. मात्र काही डॉक्टर्स आयलोपॅथीची उपचार पद्धती अवलंब करीत आहेत. या शोध घेण्यासाठी पाचोरा तालुक्यात ग्रामीण भागामध्ये शोध पथक स्थापन केले असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, तहसीलदार बी.ए. कापसे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली बोगस डॉक्टरशोध पथक तपासणी सुरु आहे. ग्रामीण भागात आजपयर्ंत नगरदेवळा, पिंपळगाव हरेश्वर, लोहार, कळमसरे, शिंदाड, नांद्रा, कुरंगी, लोहटार, भोजे कु:हाड, बाळद, अंतुर्ली आदी ठिकाणी तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांनी दिली
दरम्यान ग्रामीण भागात बरेच ठिकाणी बोगस डॉक्टर आहेत मात्र पथक येणार म्हणून अगोदरच असे डॉक्टर सावध झाल्याने तपासणी अभियानाचा फज्जा उडत आहे. पाचोरा शहरातदेखील शोध मोहीम सुरू असून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मंदार करंबलेकर यांच्या नेतृत्वखाली तपासणी सुरू आहे.