वाळकीत कपाशीचे बोगस बियाणे सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 10:28 PM2021-05-22T22:28:23+5:302021-05-22T22:29:25+5:30
वाळकी येथे शौचालयात लपवलेले ६० हजार रुपये किंमतीची ४८ पाकिटे बोगस कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाई करून जप्त केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : वाळकी ता. चोपडा येथे राहत्या घरातील शौचालयात लपवलेले ६० हजार रुपये किंमतीची ४८ पाकिटे बोगस कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाई करून जप्त केले. यातील आरोपी मात्र फरार झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, कृषी विभागाच्या जळगाव कार्यालयात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २१ रोजी संध्याकाळी संयुक्त पथकाने वाळकी ता. चोपडा येथे छापा टाकीत पांडुरंग शामराव ढिवर यांच्या घरात शौचालयात लपवलेले सुमारे साठ हजार रुपये किमतीचे शासनाचा परवाना नसलेले बियाणे आढळून आले. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात जिल्हा गुणनियंत्रण अरुण श्रीराम तायडे (५०, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग शामराव ढिवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप अराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे हे करीत आहेत.
सकाळी मिळाली गुप्त माहिती
हे बोगस बियाणे वाळकी ता. चोपडा या गावातील पांडुरंग शामराव ढिवर हे स्वत:च्या फायद्यासाठी शासनाकडून बंदी असलेले मान्यताप्राप्त नसलेले संशयित एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या पध्दतीने विनापरवाना शेतकऱ्यांना विक्री करत आहे, अशी गुप्त माहिती २१ रोजी १० वाजता फिर्यादीस मिळाली. त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विकास अधीकारी वैभव दत्तात्रय शिंदे यांना ही माहिती फोनद्वारे कळविली व चोपडा गाठले. चोपडा येथे आल्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यलयात प्रशांत विठ्ठल देसाई यांची भेट घेतली व तेथेच पंचायत समिती, कृषी अधिकारी ज्ञानेश्वर माधवराव शिंपी यांना तेथे बोलावून घेतले.
असा पडला छापा
सर्व अधिकारी व दोन शासकीय पंच सायंकाळी ५:३० वाजता चोपडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून वाळकी ता. चोपडा येथे ६:१५ वा. पोचले व संशयिताच्या घराची पाहणी केली व पुढील तपासाकरीता झाडाझडतीकरिता अधिकाऱ्यांनी आपला परिचय दिला. आरोपीच्या पत्नी आणी मुलांनी घराची झडती घेण्यास विरोध केला. याबाबत तात्काळ चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून बंदोबस्त मागविला. पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोलीस नाईक रितेश चौधरी, होमगार्ड रोशन बाविस्कर, प्रदीप शिरसाठ, महिला होमगार्ड रत्ना बडगुजर यांचे पथक दाखल होताच घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी घराच्या मागील बाजूस संडासामध्ये शासन मान्यता नसलेली कापूस बियाण्याची ५० पाकिटे असलेली एचडीपीई पांढरी गोणी सापडली.