कोळश्याच्या कंपनीत बॉयलरचा स्फोट; कामगार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:30 PM2019-07-22T12:30:57+5:302019-07-22T12:32:00+5:30
पिंप्री येथील घटना : २५ फूट उंचावर उडाला दीड टनाचा बॉयलरचा दरवाजा
जळगाव : पिंप्री (ता. धरणगाव) येथील प्राईम एनर्जी या कोळसा बनविण्याच्या कंपनीत रविवारी सकाळी ६ वाजता एका बॉयलरमध्ये अचानक गॅस भरला गेल्याने त्या बॉयलरचा स्फोट झाला़ या स्फोटात कंपनीतील कामगार नरोत्तम मारोती भोयार (४६, रा़ पिंप्री, ता़ धरणगाव) हा ठार झाला.
या कंपनीत नरोत्तम भोयार हे आॅपरेटर म्हणून कामाला होते़ कंपनीत कोळसा बनविण्याचे काम केले जाते. नरोत्तम हा रात्र पाळीला कामाला होता. दरम्यान, कोळसा बनविताना कंपनीतील बॉयलरमध्ये गॅस निर्माण होतो़ तो गॅस एका वॉलद्वारे काढला जातो. मात्र, रविवारी सकाळी ६ वाजता व्हॉल बंद असल्यामुळे बॉयलरमध्ये गॅस मोठ्या प्रमाणात साठला गेला़ काही वेळातच अचानकपणे मोठा स्फोट झाला. या स्फोटात बॉयलरचा दीड टनाचा दरवाजा २५ फुटापर्यंत उडाला़ हा दरवाजा नरोत्तम यांचा डोक्याला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच हेल्पर किसन मोरे यांनी तातडीने याची माहिती कंपनीचे मालक मुंबईस्थित नेम विरचंद सोनी यांना दिली.
सहा महिन्यांपूर्वीच लागला कामाला
मयत कामगार नरोत्तम भोयर हा गेल्या सहा महिन्यापासून कामाला लागला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.