कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर टाकले उकळते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:28+5:302021-03-15T04:15:28+5:30
जखमी फरजानाबी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, राजमालती नगरातील प्लॉट नं. ७ येथे पती जाबीर शेख, मुलगा ...
जखमी फरजानाबी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, राजमालती नगरातील प्लॉट नं. ७ येथे पती जाबीर शेख, मुलगा अश्पाक व शोएब यांसह वास्तव्यास आहेत. पती जाबीर सुपारी फोडण्याचे काम करतात तर फरजाना या धुणीभांडी करून संसाराला हातभार लावतात. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे मुले व पतीसाठी नाश्ता व स्वयंपाकासाठी फरजाना कणीक मळत होत्या, त्याच वेळेस पती जाबीर शेख आंघोळीला गेले. बाथरूममध्येच बादलीत हीटर लावून पाणी तापवण्यात आले होते. बादलीतील पाणी उकळायला लागल्यावर पती जाबीर याने उकळत्या पाण्याची बादली उचलून फरजाना यांच्या अंगावर उलटी केली. त्यात भाजल्या गेल्याने त्या किंचाळ्या मारतच धावत सुटल्या. दोन्ही मुलांनी मदतीला धाव घेतली. या वेळी जाबीर यांनी दोघा मुलांना मारहाण केली. जावई गुलाब शेख व मुलांनी जखमी फरजाना यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या जबाबावरून पती जाबीर याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास हवालदार रईस शेख करीत आहेत.