किमान आधारभूत किमतीचा चोपडा तालुक्यात बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 05:07 PM2020-10-12T17:07:34+5:302020-10-12T17:08:41+5:30
केंद्र शासनाने २०२०-२१ सालासाठी जाहीर केलेल्या शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमत दिला जात नसून चोपडा तालुक्यात बोजवारा उडालेला दिसून येत आहे.
संजय सोनवणे
चोपडा : केंद्र शासनाने २०२०-२१ सालासाठी जाहीर केलेल्या शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमत दिला जात नसून चोपडा तालुक्यात बोजवारा उडालेला दिसून येत आहे. व्यापारी मनमानीने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला (धान्याला) भाव देत आहेत. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाºयांना बोलायला तयार नाही, ना शेतकरी संघटना पुढे येताहेत. शेतकरी संघटनांनी मौन का धारण केले आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
चोपडा तालुक्यात पांढरे सोने अर्थात कापूस मोठ्या प्रमाणात पिकत असतो. या पांढºया सोन्याला सध्या शहरासह खेडोपाडी खाजगी व्यापारी कापूस ओला आहे हे कारण पुढे करून प्रतिक्विंटल केवळ चार हजार ते चार हजार दोनशे रुपये भाव देत आहेत. वास्तविक केंद्र शासनाने कापसाला मध्यम धाग्याचा असेल तर पाच हजार ५१५ रुपये प्रतिक्विंटल आणि लांब धागा असेल तर पाच हजार ८२५ रुपये प्रति क्विंटल असा किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. यासह सध्या मकाही चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. मक्याचा भाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ आठशे ते हजार रुपयांच्या दरम्यान प्रतिक्विंटलला दिला जात आहे.
वास्तविक किमान आधारभूत किमतीमध्ये मक्याचा भावही १८५० रुपये प्रति क्विंटल असताना नऊशे ते हजार रुपये प्रतिक्विंटल व्यापारी कसं काय खरेदी करीत आहेत? यासाठी बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ काय काम करीत आहे. व्यापारी शेतकºयांची लुटमार करीत असताना शेतकरी संघटना पदाधिकारी सुस्त का झाल्या आहेत? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. यासह तालुक्यात उडीद, मूग, सोयाबीन, तीळ, ज्वारी, बाजरी हे धान्य विक्रीसाठी येत आहे. त्यात ज्वारीला केंद्र शासनाने दिलेला किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल २६२० रुपये आहे. बाजरीसाठी २१५० रुपये प्रति क्विंटल भाव आहे. तुरीसाठी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव आहे. मूगासाठी सात हजार १९६ रुपये असा भाव किमान आधारभूत किमतीत ठरवला आहे. उडदासाठी सहा हजार रुपये प्रति क्विंटल, सूर्यफूल ५८८५ रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन ३८८० रुपये प्रति क्विंटल, तीळ ६८५५ रुपये प्रति क्विंटल असे भाव आणि उसाला प्रतिटन २८५० रुपये किमान आधारभूत किंमत ठरवली असूनही केवळ चोपडा साखर कारखाना बंद असल्यामुळे बाहेरील साखर कारखाने २४०० रुपये ते २५०० रुपये प्रति टन ऊसाला भाव देत आहेत. म्हणजे एकही शेतीमालाला केंद्र शासनाने ठरवून दिलेला किमान आधारभूत किमतीनुसार भाव मिळत नसल्याचे सध्या दिसून येत आहे.