पुष्पक एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 05:54 PM2017-10-18T17:54:35+5:302017-10-18T17:59:41+5:30
रेल्वे पोलिसांनी केली खंडवा, भुसावळात तपासणी
आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.१९ : १२५३३ लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या बुधवारी सकाळी अफवेने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. ही घटना बुधवारी घडली. दरम्यान, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी खंडवा आणि भुसावळ येथे या गाडीची श्वान पथकाद्वारे कसून तपासणी केली. मात्र काहीही धोकेदायक वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे प्रवाशांसह पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.
बुधवारी पहाटे नागपूर लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षात निनावी फोनवरुन १२५३३ लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या पुढील आणि मागच्या साधारण डब्यात बॉम्ब असल्याचे कळविण्यात आले. बॉम्ब असल्याचा निनावी फोन येताच लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाने तातडीने ही माहिती भुसावळ लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यांनी तत्काळ दखल घेत भुसावळ आरपीएफ आणि खंडवा येथे कळविण्यात आली.
पुष्पक एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर बुधवारी दुपारी १२.१५ वाजता येताच आरपीएफ श्वान पथक, जळगाव पोलीस श्वान पथकाने संपूर्ण गाडीची कसून तपासणी करण्यात आली. मात्र काहीही आढळून आले नाही. ही गाडी दुपारी १२.२५ वाजता मुंबईकडे रवाना करण्यात आली.
पुष्पक एक्स्प्रेसच्या पुढील आणि मागील साधारण श्रेणीच्या डब्यात बॉम्ब असल्याचा निनावी फोन नागपूर लोहमार्ग नियंत्रण कक्षाला आला. भुसावळ येथे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे तपासणी केली. काहीही आढळले नाही. गाडी वेळेवर रवाना झाली.
- व्ही.के.लांजिवार,
आरपीएफ निरीक्षक, भुसावळ रेल्वे स्थानक.