धाकट्याच्या मदतीला आला थोरला; बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाले यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 06:02 AM2024-02-24T06:02:17+5:302024-02-24T06:02:27+5:30
हर्षल जितेंद्र दुसाने (रा.जळगाव) असे या रुग्णाचे नाव. प्रत्यारोपण या वयात शक्य नसल्याचे सांगत वेल्लोर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), नवी दिल्लीसह राज्यातील डॉक्टरांनीही त्याला नकार दिला होता.
जळगाव : वयाच्या २४ व्या वर्षी थॅलेसेमियाग्रस्तावर अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची प्रक्रिया (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) करणे धोकादायक ठरेल, असा वैद्यकीय यंत्रणांचा निष्कर्ष. मात्र आटणाऱ्या रक्ताने हतबल झालेला थॅलेसेमियाग्रस्त जिद्दीला पेटलेला. अखेर नाशकातील डॉक्टरांनी धोक्याची जाणीव करुन देत रुग्णाच्या मोठ्या भावाच्या २२ प्रकारच्या रक्तचाचण्या करुन यशस्वी प्रत्यारोपण केले. वयाच्या २४ व्या वर्षी झालेली ही प्रक्रिया थॅलेसेमियाग्रस्तांमध्ये नवी उमेद देणारी ठरली आहे.
हर्षल जितेंद्र दुसाने (रा.जळगाव) असे या रुग्णाचे नाव. प्रत्यारोपण या वयात शक्य नसल्याचे सांगत वेल्लोर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), नवी दिल्लीसह राज्यातील डॉक्टरांनीही त्याला नकार दिला होता.
५ वर्षांआतील रुग्णांसाठी या प्रक्रियेचा यशस्वी दर ७० ते ८० टक्के तर तारुण्यातील दर २५ टक्के इतका आहे. गेल्या २२ वर्षात या वयातल्या रुग्णावर पहिल्यांदाच प्रत्यारोपण केले. यापूर्वी राज्यात या वयातल्या रुग्णावर दोन ते तीन यशस्वी प्रक्रिया यापूर्वी झाल्या आहेत. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
-डॉ. प्रीतेश जुनागडे, रक्तशास्त्र तज्ज्ञ, नाशिक.