मृगपक्षीशास्त्र पुस्तक - एक प्रवास

By Admin | Published: June 14, 2017 01:35 PM2017-06-14T13:35:23+5:302017-06-14T13:35:23+5:30

जैन मुनी हंसदेव यांनी अक्षरश: स्वत: जंगलात राहून अनेक वर्षे केलेल्या निरीक्षणावर आधारित लिहिले आहे

The Book of Mgg Po Box - A Journey | मृगपक्षीशास्त्र पुस्तक - एक प्रवास

मृगपक्षीशास्त्र पुस्तक - एक प्रवास

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14 - शनिवार 3 जून 2017 ला मित्रवर्य  सुशील अत्रे यांचा एक सुंदर लेख ‘मृगपक्षीशास्त्राचे जनक हंसदेव’’ प्रसिद्ध झाला आणि त्या पुस्तकाविषयी आठवणी जाग्या झाल्या. हे पुस्तक जैन मुनी हंसदेव यांनी अक्षरश: स्वत: जंगलात राहून अनेक वर्षे केलेल्या निरीक्षणावर आधारित लिहिले आहे. मारुती चितमपल्ली यांनी ते मराठीत आणले. पण ते मराठीत कसे आले आणि नंतर जळगावला कसे आले ही मोठी रंजक गोष्ट आहे.
चितमपल्ली काकांची माझी पहिली भेट एका जंगलातच झाली. तेव्हापासून या अत्यंत आदरणीय आणि ऋषितुल्य माणसाचा सहवास आणि मैत्री  लाभली.  अनेक वेळा भेटी आणि अर्थातच जंगल, पक्षी, प्राणी, लेखन, वाचन हे गप्पांचे विषय झाले.
काकांनी या पुस्तकाची मोठी रंजक गोष्ट सांगितली. त्यांच्या आईला तिरुपती दर्शनासाठी घेऊन जायचे त्यांनी ठरवले होते. तसे ते दोघेही तेथे गेले. तिरुपतीचे ग्रंथालय खूप मोठे. अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आहेत. काकांना वेळ मिळाला तसा ते या ग्रंथालयात गेले. तेथे मृगपक्षी शास्त्र या ग्रंथाची हस्तलिखित प्रत होती. तेव्हा आजच्या सारख्या छायाप्रतीच्या सोय नव्हती.  काकांनी ग्रंथ वाचायला मिळेल का विचारले तर, ‘‘कोणताही ग्रंथ बाहेर नेता येणार नाही’’ असा स्पष्ट नियमच असल्याचे त्यांना ग्रंथपालांनी सांगितले. ग्रंथ तर हवाच, पण राहण्याच्या जागी वाचायला नेता येणार नाही आणि आईला दिवसभर एकटे सोडता येणार नाही. आता काय करावे, असा मोठा प्रश्न पडला. काकांनी चक्क ग्रंथ हाताने नकलून घ्यायची तयार केली. आईला कल्पना दिली आणि तिची परतीच्या प्रवासाची तयारी करून दिली आणि त्यांना परत पाठवून काका तेथेच राहिले. सकाळी ग्रंथालयात कागद पेन घेऊन जायचे आणि सायंकाळर्पयत लिहित बसायचे. असे करून हा मूळ संस्कृत ग्रंथ त्यांनी संपूर्ण शब्दाबरहुकूम स्वहस्ते नकलून काढला.
संस्कृत ग्रंथासाठीच त्यांनी संस्कृत अध्ययन पाठशाळेत जाऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घेतले होते. त्यासाठी त्यांना दिवसभर नोकरी सांभाळून सायंकाळी अंघोळ करून सोवळ्यात पाठशाळेत जावे लागे आणि त्यांच्यापेक्षा अतिशय लहान मुलांसोबतच अभ्यास करावा लागे.  या ग्रंथाचे मराठीत संपादन (भाषांतर नव्हे) त्यांनी भातखंडे शास्त्रींच्या मदतीने केले. या ग्रंथाविषयी त्यांनी स्वत:च ‘‘शब्दांचे धन’’ या त्यांच्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे.
हे संपादन प्रसिद्ध कोण करणार असा प्रश्न आला तेव्हा महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे तो प्रकाशित करावा, असा सल्ला त्यांना मिळाला.
तेव्हा अध्यक्ष होते म.म.दत्ताे वामन पोतदार. त्यांचा खूप दरारा होता.  त्यांचे या ग्रंथातील चितमपल्ली आणि भातखंडे शास्त्री यांनी लावलेल्या काही शब्दांच्या अर्थाबद्दल वेगळे मत होते. ते त्याशी सहमत नव्हते. कारण अमरकोश पलीकडे काही संस्कृत अर्थ सांगणारे असू शकते, हेच त्यांना पटत नव्हते. उदा. या ग्रंथात सिंहाचे 6 प्रकार आहेत, त्याचे अर्थ वेगळे आहेत, सवयी वेगळ्या आहेत आदी.. पण अमरकोशात सिंह याचा फक्त एक अर्थ आणि त्याचे वर्णन ही एकच. मग मृगपक्षी शास्त्रात हे काय मान्यता नसलेले लिहून ठेवले आहे? या त्यांच्या वैयक्तिक मतामुळे हा ग्रंथ चक्क 12/13 वर्षे सरकारकडे पडून होता. मानधन म्हणून मिळालेले तुटपुंजे  10/12 रुपये चितमपल्ली यांनी कितीतरी वेळा त्यांना परत घ्या आणि माझा ग्रंथ मला परत द्या, अशी विनंती केली, पण ते घडले नाही. नंतर य.दि.फडके हे महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष झाले. तेव्हा या पुस्तकाला छपाई व प्रकाशनाचा मुहूर्त सापडला.
काकांच्या एका भेटीत ही सगळी हकीगत कळली. जळगावला हे पुस्तक शोधायचा प्रय} केला. कुठेच हे पुस्तक माहित सुद्धा नव्हते. आता काय करावे? तेव्हा हे पुस्तक मला कुठे आणि कसे मिळू शकते असा प्रश्न मी काकांनाच विचारला असता, ‘‘सरकारकडेच’’ एव्हढेच उत्तर त्यांनी दिले. तोर्पयत मला सरकारचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि त्यांचा कारभार याबद्दल काहीच माहिती नव्हती.
मुंबईला गेलो की तपास करीत असे पण काहीच हाती लागत नव्हते. ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांना मी एका भेटीत हे सांगितले, ‘‘माझी प}ी (सुनीता जैन) तुम्हाला मदत करील’’ असे त्यांनी सांगितले.
 आधी पत्राने तारीख ठरवून त्यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात गेलो.  त्यांनी कुणाला जाऊन भेट सांगितले. त्या विभागात गेल्यावर कळले की सरकारचे एक गोदाम आहे. सगळी प्रकाशने तेथे ‘‘पडलेली’’ असतात. चिकाटीने गोदाम रक्षकांना भेटलो, ‘‘गोदामात काय कोठे पडले असेल हे नक्की सांगता येणार नाही, तेथे जाऊन शोधावे लागेल’’ हे त्यांचे उत्तर. मीही तयारीनेच गेलो होतो, म्हटले चालेल, मी देखील शोधू लागतो.
महत्प्रयासाने 2 प्रती सापडल्या. कव्हर फाटलेले, बांधणी ढिली झालेली. परिस्थिती अर्थातच ठीक अजिबात नव्हती. किंमत प्रत्येकी रु.62. त्या सरकारी धुळीने आणि कोळीष्टकाने भरलेल्या गोदामात मी आनंदाने उडय़ा मारायच्याच बाकी होत्या. जळगावला आल्यावर त्यातली एक प्रत अर्थातच सुशील अत्रे या पुस्तक प्रेमी मित्राला दिली. तेव्हा मोबाईल नव्हते. सगळा मामला पत्र व्यवहारानेच होता आणि त्यात फार गंमत आणि सुंदरता होती. या निमित्ताने झालेली पत्रापत्री देखील आनंददायी होती आणि आहे. सुशीलच्या लेखाने या सर्व आठवणी जाग्या झाल्या आणि हे लिहिण्याचे निमित्त मिळाले.
- अनिल शाह

Web Title: The Book of Mgg Po Box - A Journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.