रेल्वे हेल्पलाईनवर घर व गॅस सिलिंडरची बुकिंग, मोबाइल रिचार्ज अन् बरेच काही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:17 AM2021-02-09T04:17:57+5:302021-02-09T04:17:57+5:30
जळगाव : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासात कोणतीही अडचण किंवा संकट उद्भवल्यास मदतीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे १८२ हा टोल ...
जळगाव : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासात कोणतीही अडचण किंवा संकट उद्भवल्यास मदतीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे १८२ हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. मात्र, या हेल्पलाइनवर मदतीऐवजी घर व गॅस सिलिंडरची बुकिंग, मोबाल रिचार्ज करायचे आहे यासारखे प्रश्न विचारले जात आहेत. रोजच्याच या फोन काॅलला नियंत्रण कक्षातील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान पुरते वैतागले आहेत.
रेल्वेत प्रवासादरम्यान अनेकवेळा प्रवाशांना जागेच्या समस्या येत असतात. तिकीट आरक्षित असतानांही समोरील व्यक्ती जागेवर उठत नसल्यामुळे, अनेक नागरिक रेल्वेच्या हेल्पलाइनवर तक्रार करून रेल्वे पोलिसांकडे मदत मागत असतात. यावेळी नियंत्रण कक्षातील रेल्वे पोलीस तत्काळ गाडीतील रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देऊन, संबंधित प्रवाशाची तक्रार सोडविण्यासाठी पाठवत असतात. २४ तास प्रवाशांसाठी ही हेल्पलाइन सुरू असते. मात्र, या हेल्पलाइनवर अलीकडे प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारच्या तक्रारी करण्यात येत आहेत. यामुळे नियंत्रण कक्षातील रेल्वे पोलिसांना या प्रवाशांची समजूत काढतांना, चांगलेच नाकी नऊ येत आहे. मदतीसाठी हेल्पलाइन असतानाही प्रवासी खाण्या-पिण्याच्या ऑर्डरीकडून रेल्वे पोलिसांकडून मदत मागण्याचा प्रयत्न करतात. यामुळे रेल्वे पोलिसांचा वेळ वाया जात असून नाहक त्रास होत आहे. दरम्यान, या तक्रारींची आता नेहमीची सवय झाली असून, मदतीपेक्षा ऑर्डर करणाऱ्यांचेच फोन जास्त येत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.
इन्फो :
कुणाला पिझ्झा हवा असतो, तर कुणाला समोसा
भुसावळ येथील नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांना कुठल्याही मदतीसाठी २४ तास रेल्वेचा नियंत्रण कक्ष सुरू असतो. प्रवाशांची जशी समस्या असते, तशी सोडण्याविण्यात येते. कुणाचे सामान, मोबाइल किंवा इतर वस्तू चोरीला गेल्या, गाडीत वाद झाल्यास, कुणाची तब्येत बिघडल्यास आरपीएफतर्फे तत्काळ मदत पोहचविली जाते. मात्र, या व्यक्तिरिक्त अनेक प्रवाशांकडून जेवण हवे आहे, समोसा हवा आहे, कोल्ड्रिंक्स पाठवा, पिझ्झा पाठवा इतकेच नव्हे तर कुणी मोबाइल रिचार्जसह गॅस बुकिंग करण्याच्या तक्रारींही करत असल्याचे सांगण्यात आले. अशा वेळी रेल्वे पोलिसांकडून मात्र, प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी ही हेल्पलाइन आहे, समोसा किंवा पिझ्झा पाहिजे असल्यास आयआरटीसीकडे जेवणाची ऑर्डर करण्याबाबत सल्ला देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
इन्फो :
मदतीसाठी बोटावर मोजण्याइतकेच कॉल
प्रवासात अडचणीत किंवा संकटात असल्याबाबत मदत करण्यासाठी हेल्पलाइन कक्षावर २४ तासात बोटावर मोजण्या इतक्याच प्रवाशांचे कॉल येतात. यामध्ये काही प्रवाशांच्या किरकोळ तक्रारी असतात. तर सर्वांधिक कॉल हे खाण्या-पिण्याच्या मागणीचे असल्याचे सांगण्यात आले.