बुकशेल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:01 AM2017-09-25T01:01:53+5:302017-09-25T01:02:22+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘बुकशेल्फ’ हे पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून देणारे नवीन सदर लिहिताहेत रवींद्र मोराणकर
कुंदकळ्या : व्यक्तित्वात दडलेला कवी निवृत्त प्राध्यापक बी. एस. चौधरी यांचा ’कुंदकळ्या’ हा पहिला कवितासंग्रह. त्यांच्या व्यक्तित्वात हळवा भावकवी दडलेला आहे, हे ‘कुंदकळ्या’ वाचल्यानंतर निदर्शनास येते. या संग्रहातील कविता सन 1957 ते 2005 या कालावधीत जन्माला आलेल्या आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची प्रथमदर्शनी लक्षात येणारी विशेष बाब म्हणजे त्यांच्या जीवनप्रवाहासोबत वाढलेल्या व व्यक्तित्वविकासासोबत विकसीत होत गेलेल्या आहेत. आयुष्यातील 50 वर्षे ज्या सहधर्मचारिणीसोबत व्यतित केली त्यांच्या सहजीवनाला व संसारातील त्यागाला वंदना करीत कुंदाताईंच्या नावातील कुंदकळ्यांचा अविष्कार कविता वाटतो. कुंदकळ्या : कवी : बी. एस. चौधरी, प्रकाशक : मैफल प्रकाशन, मूल्य 75 रुपये स्त्री वेदनेचा हुंकार धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील लेखिका लतिका चौधरी यांनी ‘त्रिकोणातील वादळ पेलताना’ हे 290 पानांचे आत्मकथन लिहिले आहे. त्यांनी आत्मकथनाच्या पूर्वार्धात वेलू नावाच्या मुलीच्या जीवनाच्या कथेशी जोडलेले आहे आणि उत्तरार्धात वेलू स्वत:च स्वत:ची गोष्ट सांगते. मध्यमवर्गीय कुटुंबातील ह्या वेलूचे लग्न नकळत्या वयात होते आणि त्यामुळे तिच्या आयुष्याची होणारी परवड लेखिकेने वर्णन केलेली आहे. वेलू पारंपरिक स्त्री जन्माची कथा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सासरी एवढा जाच असूनदेखील तिला सासरीच परत यायचे आहे. टाकलेल्या बाईला समाज मान देत नाही हा पारंपरिक समज तिच्या मनावर खोलवर रुजलेला आहे. त्रिकोणातील वादळ पेलताना लेखिका : लतिका चौधरी, प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन मूल्य : 350 रुपये