लोकमत आॅन द व्हील्सलोकमत आॅन द व्हील्स : त्याच त्या आश्वासनांना आता कंटाळलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:51 PM2019-04-09T12:51:26+5:302019-04-09T12:56:05+5:30
नंदुरबार ते अक्कलकुवा ६५ किमी
मनोज शेलार
नंदुरबार : वर्षानुवर्षे तेच ते प्रश्न, समस्या कायम आहेत. दरवेळी आश्वासने मिळतात, परंतु प्रश्न सुटत नाहीत. असे असले तरी योजनांच्या अंमलबजावणीची गती वाढली, दळणवळणाच्या सुविधा वाढल्या या बाबीदेखील नाकारून चालणार नाही असा एकूणच सूर नंदुरबार-अक्कलकुवा प्रवासादरम्यान विद्यार्थी व नोकरदारांकडून ऐकावयास मिळाला.
नंदुरबार ते अक्कलकुवा प्रवासात एकूणच निवडणुकीविषयी नागरिकांच्या मनात काय चालले याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या नंदुरबार-अक्कलकुवा या निझरमार्गे धावणाऱ्या बसमध्ये बहुतांश अपडाऊन करणारे नोकरदार आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थीच जास्त होते. बसने नंदुरबार सोडल्यानंतर जवळ बसलेल्या काहींना निवडणुकीविषयी बोलते करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला नोकरदार बोलण्यास कचरले, परंतु मुद्यांना हात घालताच त्यांनी विविध बाबींवर मते मांडली. सातपुड्यात आजही बेरोजगारी, स्वयंरोजगाराचा अभाव, उत्पादीत होणाऱ्या आंबा, सीताफळ, महूफुले यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग हे प्रश्न आहेत. दळणवळणाची सुविधा काही प्रमाणात सुधारली आहे. दºयाखोºयात मोबाइल नेटवर्क मिळू लागले आहे. वाहने जाऊ लागली आहेत. परंतु हाताला काम नाही त्याचे काय? असा प्रश्न एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने उपस्थित केला. दरवर्षाचे स्थलांतर पाचवीला पुजलेले आहे. आश्वासने मिळतात, परंतु कामाचा ठिकाणा नाही. कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे सरकारी आकडे कागदावर रंगविले जातात. गरोदर महिला, माता मृत्यू यांचे प्रमाण जैसे थे आहे. मलिदा खाणारे गब्बर तर आदिवासी अधिकच कुपोषित होत चालले आहेत. कुठे आहेत योजना आणि कोण त्या राबवित आहेत याचेही सोशल आॅडिट होणे गरजेचे असल्याचा सूर बसमधील बहुतेक सुशिक्षित मतदारांनी व्यक्त केला.
‘विकास’ची तुलना...
प्रवासात गुजरात हद्दीतील १५ ते २० किलोमीटरचा भाग होता. त्या भागातील प्रवासीही बसमध्ये होते. त्यांनीही ‘विकासा’ची तुलना केली. त्यांच्याही आदिवासी भागातील समस्या काही वेगळ्या नाहीत. हे चर्चेवरून स्पष्ट झालेच.