बोरी धरणात अवघा ७ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 09:18 PM2019-08-08T21:18:11+5:302019-08-08T21:18:18+5:30
पारोळा : जिल्हायात सर्वत्र पाऊस पडत असून अनेक धरणांतून पाणी ओसंडून वाहत आहे.. मात्र, तामसवाडी येथील बोरी धरणात ...
पारोळा : जिल्हायात सर्वत्र पाऊस पडत असून अनेक धरणांतून पाणी ओसंडून वाहत आहे.. मात्र, तामसवाडी येथील बोरी धरणात अवघा ७.५४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. यामुळे आतापर्यंतच्या पावसाचा धरणावर काही परिणाम झाला नसल्याचे जाणवते.
धरणात एकूण ४०.३१ दलघमी साठ्यापैकी उपयुक्त साठा २५.१५ दलघमी तर मृत साठा १५.१६ दलघमी एवढा आहे. ८ आॅगस्टअखेर २६३.२६० दलघमी म्हणजे ४.५४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. या पाण्यावर पाणी पुरवठा असलेल्या योजनेत तामसवाडी व ४ गावांसाठी ०.६२ दलघमी, बोळे व ६ गावांसाठी ०.४० दलघमी, ढोलीसाठी ०.०२४ दलघमी, तर पारोळा शहरासाठी २.१४ दलघमी पाणी आरक्षित आहे. म्हसवा येथे पाणी पातळी ४२.८९ मीटर, १.४९ टक्के व पाणीसाठा ०.०५१६ दलघमी आहे. भोकरबारी प्रकल्प, कंकराज, शिरसमणी, सावरखेडा, निसर्डी, आर्डी, पिंपळकोठा ल.पा. येथे मृत साठा आहे. बोळे ल.पा. येथे १० टक्के पाणीसाठा आहे.
बोरी धरणावर धुळे जिल्ह्यातील फागणे, मुकटीसह २० गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त पाईपलाईनमुळे या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. बाबरेसह बोदगाव कुंदाने, धामणगाव येथील पुरवठाही खंडित झाला आहे.
तालुक्यातील शेतक-यांसह शहरी भागातील नागरिकांना धरण भरण्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात अल्प पर्जन्यमानामुळे बोरी नदीलाही पाण्याचा ओघ कमी झाला. त्याचा परिसरातील बागायती शेतीवर परिणाम झाला आहे.