बाप-लेकावर दोघांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:26 PM2019-01-18T12:26:26+5:302019-01-18T12:26:54+5:30
जळगावातील घटना
जळगाव : हात उसनवारीने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही पुन्हा पैसे द्यावे म्हणून खलीलोद्दीन कुतुबोद्दीन शेख (वय ५२) व त्यांचा मुलगा परवेज शेख या दोघांवर फायटर व धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजता कासमवाडी येथील बाजारपट्ट्यात घडली. दरम्यान, हल्लेखोर सागर पाटील व यश गोयल उर्फ मॉडेल या दोघांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
खलीलोद्दीन शेख हे पाईप फिटींगचा व्यवसाय करतात. या व्यवसायासाठी शेख यांनी कमलबाई नावाच्या महिलेकडून ५० हजार रुपये हातउसनवारीने घेतले होते. काही दिवसानंतर एकवेळा ३० हजार व दुसऱ्यावेळी २० हजार असे दोन टप्प्यात पूर्ण पैसे परत केले होते, परंतु तरीही कमलबाईकडून पैशाची मागणी होत होती. अशातच बुधवारी रात्री काम आटोपून शेख व त्यांचा मुलगा परवेज घरी जात असताना कासमवाडीतील बाजारपट्ट्यात उर्दू शाळेजवळ सागर पाटील व गोयल यांनी रस्त्यात अडवून कमलबाईचे पैसे दे म्हणत सागर याने फायटरने खलीलोद्दीन यांना मारहाण केली. तर गोयल याने मानेवर चावा घेऊन दगडाने डोके फोडले. वडीलांना सोडविण्यासाठी आलेल्या परवेज याच्यावरही धारदार पट्टीने हल्ला केला.
याआधीही वादाची पार्श्वभूमी
सागर याने याआधी देखील पांडे चौकात भूषण पाटील या तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखविला होता असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जखमीचा जबाब घेतल्यानंतर गुुरुवारी सागर व गोयल या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील व सचिन पाटील यांनी दोघांना अटक केली.
दोन खून केले आहेत...
या घटनेत रक्तबंबाळ अवस्थेत पाहून सागर व गोयल या दोघांनीच शेख यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले व तेथे अपघात झाला असेच सांग म्हणून दम दिला. याआधी मी दोन खून केले आहेत, तुला आम्ही मारले असे कोणाला सांगितले तर तुम्हा बापलेकाचे मर्डर करु अशी धमकी देत दोन्ही जण रुग्णालयातून निघून गेले होते.