चोपड्यात सलग दुसऱ्या दिवशी दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:11 PM2021-03-17T23:11:26+5:302021-03-17T23:14:26+5:30
बुधवारी प्राप्त अहवालात सात मृतांमध्ये चोपडा तालुक्यातील दोन महिला तसेच भुसावळ, भडगाव, चाळीसगाव व जळगाव येथील बाधितांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हयात कोरोसा संसर्गामुळे मृत्यूचे थैमान सुरूच असून बुधवारी प्राप्त अहवालात सात मृतांमध्ये चोपडा तालुक्यातील दोन महिला तसेच भुसावळ, भडगाव, चाळीसगाव व जळगाव येथील बाधितांचा समावेश आहे.
जिल्हयात गत सप्ताहापासून कोरोनाच्या बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रोज नऊशे ते हजाराच्या जवळपास बाधित आढळत असल्याने चिंतेच वातावरण आहे.
जिल्हयात सातत्याने वाढ
जिल्ह्यात आजचा मृत्यूदर हा १.९९ टक्के आहे तर गेल्या आठवड्यात तो २.१५ टक्के होता. जिल्ह्यात आतापपर्यंत १४६२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र रिकव्हरी दर हा ८६.३९ टक्के आहे. जिल्ह्यात बुधवारी पाप्त माहिती नुसार सात जणाचा मृत्यू झाला. त्यापैकी चोपड्यातील ५७ व ८८ वर्षीय महिलांचा समावेश आहे. तसेच जळगाव शहरातील ६५ वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील ८१ वर्षीय पुरूष, भडगाव तालुक्यातील ७८ वर्षीय पुरूष, चाळीसगाव तालुक्यातील ७१ वर्षीय व अमळनेर तालुक्यातील ७१ वर्षीय पुरूषाचा मृतांमध्ये समावेश आहे.
पाचोरा शहरात उद्यापासून तीन दिवसांचा कर्फ्यू
पाचोरा : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाचोरा शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. दि १९,२० व २१ रोजी पाचोरा शहर पूर्णपणे लॉकडाउन करण्यात येणार असल्याचे आदेश प्राप्त झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाचोरा तालुक्यात गेल्या आठ दिवसात २००पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसात पाचोरा शहरात पूर्णपणे लॉकडाऊन पाळला जाणार आहे. यात भाजीपाला दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या, किराणा दुकान, स्टेशनरी, कटलरी, कापड दुकान यासह शासकीय कार्यालयात अत्यल्प उपस्थिती, शाळा महाविद्यालय, क्लासेस, रस्ते वाहतूक, उपाहारगृहे, आठवडे बाजार, शासकीय व धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहणार असून विवाह समारंभदेखील न करण्याचे आदेशात नमूद केले आहे. पाचोरा शहरात दररोज सरासरी २५ रुग्णांची भर पडत असून खाजगी व शासकीय कोविड सेंटरदेखील सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता पूर्णपणे लॉकडाऊन पाळावा, असे आवाहन पाचोरा उपविभागाचे प्रांतधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे. लॉकडाऊनचे नियम व कोरोना प्रतिबंधक उपायांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही प्रांताधिकारी यांनी दिला आहे.