चोर चोर म्हणताच दोघांनी ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:21 PM2019-03-02T12:21:06+5:302019-03-02T12:22:39+5:30
चोरीचा प्रयत्न
जळगाव : आदर्शनगरामधील उत्कर्ष सासायटीतील रहिवासी अजय साळुंखे यांच्या कुलूपबंद घरात अज्ञान दोन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली़ हा प्रकार शेजारी राहणारे संतोष वर्मा यांच्या लक्षात येताच त्यांनी चोऱ़चोऱ़असा आरडा-ओरड करताच दोघांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली़ त्यामुळे घरातील कुठलीही वस्तू चोरीला गेली नाही़ याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़
अजय साळुंखे हे उत्कर्ष सोसायटीत सुरेश देवराम देशमुख यांच्या घरात भाड्याने राहतात़ ते दोन ते तीन दिवसांपूर्वी सामनेर येथे गेले होते़ त्यामुळे घराला कुलूप होते़ ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे सुमारे ३़४५ वाजेच्या सुमारास अजय साळुंखे यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला़ कुलूप तोडल्यानंतर कडी उघडत असताना शेजारी राहणारे संतोष वर्मा यांना कुणीतरी दरवाजा उघडत असल्याचा आवाज आला़ त्यांनी लागलीच घराबाहेर येऊन पाहिले तर त्यांना दोन चोर दरवाजा उघडताना दिसले़ त्यांनी त्वरीत चोऱ़़चोऱ़़असा आवाज देण्यास सुरूवात केली़
शेजारचे जागी झाले पाहून चोरट्यांनी देखील त्या ठिकाणाहून पळ काढला़ चोरट्यांनी फक्त सोबत कुलूपच नेले़ घरातील कुठलीही वस्तु चोरीला गेली नाही़
हा प्रकार वर्मा यांनी अजय यांनी कळवताच त्यांनी सकाळीच घरी धाव घेत रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले़ त्यानंतर तक्रार दाखल केली़ चोरट्यांनी काळ्या रंगाचे कपडे आणि तोंडाला रूमाल बांधल्याचे वर्मा यांनी सांगितले़
महिनाभरात पाच ते सहा चोऱ्या
आदर्शनगरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून गेल्या महिन्याभरात पाच ते सहा ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे़