युवकास दोघांनी मारहाण करीत लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:37 AM2019-01-13T11:37:24+5:302019-01-13T11:38:43+5:30
रोकड व मोबाईल केला लंपास
जळगाव : असोद्याहून दुचाकीवरुन भादली बुद्रुक येथे घराकडे जात असलेल्या रितेश भागवत नारखेडे (२१, रा. भादली बुद्रुक) या तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याच्याकडील ४ हजार रोख असलेले पाकीट व मोबाईल असा ऐवज दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लांबविल्याची थरारक घटना ११ रोजी रात्री ७.४५ वाजता घडली.
दुचाकीवरुन आलेल्या व तोंडाला रुमाल बांधलेल्या या दोघांनी दोघांनी रितेशला धावत्या दुचाकीवरुन खाली पाडत त्याच्याकडील ऐवज लांबविल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
रितेश भागवत नारखेडे हा तरुण खाजगी कामासाठी दुचाकीने (क्र. एम.एच १९ सी.ई. ४१४७ ) ने शुक्रवारी असोद्याला गेला होता. तिथून परतत असताना असोदा गावाच्या पाटचारीजवळ रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन दोन जण त्याचा पाठलाग करत आले. त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. गाडी शेजारी-शेजारी आल्यावर मागे बसलेल्या एकाने रितेशला धावत्या दुचाकीवरुन ओढत मारहाण केली.
‘तू बाईचे नाव घेतो’ म्हणत लांबविला ऐवज
दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने खाली पडलेल्या रितेशला त्याच्या जवळील लोखंडी रॉडने मारहाण करण्यात सुरुवात केली. झटापट होत असताना त्याने रितेशला धरुन ठेवले. तर दुसऱ्या साथीदाराने रितेशला ‘तु बाईचे नाव घेतो’ असा दम भरत त्याच्या खिशातील पाकिट काढले. या पाकीटात चार हजार रुपये होते. या दोघांनी रितेश जवळून मोबाईलही हिसकावून घेतला. यानंतर रितेशला जोरदार धक्का मारून भामटे पसार झाले. मारहाणीत रितेशला दुखापत झाली आहे.