बोदवड नगरपंचायतीने सफाई कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 06:18 PM2018-09-02T18:18:57+5:302018-09-02T18:19:33+5:30
सफाई कर्मचाºयांच्या ‘काम बंद’ आंदोलनामुळे शहरात घाणीचे साम्राज्य
बोदवड, जि.जळगाव : आरोग्य विभागातील सफाई कर्मचाºयांनी अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्याने नगरपंचायतीने त्यांना नोटीस बजावली आहे.
पगारवाढीच्या मागणीसाठी नगरपंचायतीच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाºयांनी शनिवारपासून अचानक कामबंद आंदोलन पुकारले आहे. यात सफाई करणारे सर्व म्हणजे ५४ कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे गावात सफाई होत नसल्याने शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच पावसाने भर घातल्याने काही ठिकाणी तर दुर्गंधीही पसरली होती. शेकडो टन केरकचरा रस्त्यावर ठिकठिकाणी तसेच नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बाहेरही साचलेला आहे. काही ठिकाणी आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. यासाठी नगरपंचायतीने तत्काळ हालचाल करण्याची शहरवासीयांची अपेक्षा आहे.
काही सफाई कर्मचाºयांचे वर्षभराचे वेतन थकले आहे. नगरपंचायातीमध्ये काही कर्मचाºयांचे निवृत्तीवेतन थकीत आहे. याबाबत सफाई कर्मचारी सोमवारी प्रशासनाला निवेदन देणार आहेत.
सफाई कर्मचाºयांना मिळतो ८० रुपये रोज
नगरपंचायतीच्या कर्मचाºयांना अद्याप शासकीय दराप्रमाणे पगार लागू झालेले नाही. त्यांना ग्रामपंचायतीच्या दरानुसार ८० रुपयांप्रमाणे रोज मिळत आहे. या पगारावर संसाराचा रहाटगाडा चालवणे महागाईच्या दृष्टीने अशक्य असल्याची कर्मचाºयांची भूमिका आहे.
कर्मचाºयांनी अचानक ‘काम बंद’ पुकारल्याने नगरपंचायतीने रविवारी सर्व ५४ कर्मचाºयांना नोटीस बजावली असून, तत्काळ कामावर रुजू होण्याचे सूचित केले आहे.
दरम्यान, याबाबत सफाई मुकादम मनोज छापरीबंद यांनी सोमवारी पुन्हा मुख्याधिकाºयांना निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे.
सफाई कर्मचाºयांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे रविवारी नगरपंचायतीच्या इमारतीसमोर केरकचरा संकलित करणारे वाहन असेच उभे होते. तसेच इमारतीसमोर केरकचरा घाण साचलेली होती, तर शहरातील काही भागातील घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.