वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन् जाळ्यात फसले; फ्रेंचाइजीच्या नावाने उद्योजकाला ४० लाखात गंडविले
By सुनील पाटील | Updated: February 21, 2025 17:54 IST2025-02-21T17:53:32+5:302025-02-21T17:54:04+5:30
पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, अशोक बियाणी हे मुलगा निकुंज व सून अमृता बियाणी असे गणपती नगरातील सुमन रेसीडेन्सी येथे वास्तव्यास आहेत.

वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन् जाळ्यात फसले; फ्रेंचाइजीच्या नावाने उद्योजकाला ४० लाखात गंडविले
जळगाव : वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन् तिथेच उद्योजकाला जाळ्यात अडकवून फ्रेंचाइजीच्या नावाने ३९ लाख ५० हजार रुपयात गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोक गिरधर बियाणी (वय ६८, रा.गणपती नगर, जळगाव) असे पीडित उद्योजकाचे नाव आहे. दिपेश कमलेश रुपानी (रा.श्रीराम कॉलनी, जळगाव) व आकाश सुरजमल सिध्दू उर्फ आकाश वर्मा (रा.अमरावती) या दोघांविरुध्द गुरुवारी रात्री रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, अशोक बियाणी हे मुलगा निकुंज व सून अमृता बियाणी असे गणपती नगरातील सुमन रेसीडेन्सी येथे वास्तव्यास आहेत. त्यांची उमाळा येथे पॅकींग पुठ्ठा,खोके तयार करण्याची कंपनी असून बाप-लेक कामकाज पाहतात. कोरोना काळात मुलगा निकुंज बियाणी याची दिपेश कमलेश रुपानी याच्यासोबत ओळख झाली. दिपेश याने निकुंज याला हर्बोलाईफचे वजन कमी करण्याचे उत्पादन विकत दिले होते. या उत्पादनाचा काही दिवसांत निकुंज यांना फरक जाणवला.त्यातून दोघांच्या भेटी, गाठी व संबंध वाढले. अशातच दिपेशने निकुंज याला हर्बोलाईफच्या प्रॉडक्टची फ्रेंचाइजी घेण्याचा सल्ला देत गुंतवणुक करण्यास सांगितले. त्यानुसार रुपानी व कंपनीचे व्यवस्थापक आकाश वर्मा नावाचा व्यक्ती अशा देाघांनी कंपनीची योजना सांगून २२ लाख रुपये गुंतवायला सांगितले.कंपनीचे जास्तीत जास्त प्रॉडक्ट हे ऑनलाइन विक्री होणार आहे. तुम्हाला घरबसल्या ७० टक्केचा थेट लाभ होईल अशा भुलथापा देत गुंतवणुक करण्यास भाग पाडले.
असे घेतले टप्प्याटप्प्याने पैसे
अन्न व औषधचे परवाने, दुकान परवाना यासाठी ४ लाख ४० हजार रुपये घेवून नंतर दुकानाचे डिपॉझीटसाठी ६० हजार घेतले. बियाणी पुता-पूत्रांनी पहिल्यांदा ४ लाख ४० हजार दुसऱ्यांदा १७ लाख ५० हजार, तिसऱ्यांदा १७ लाख ६० हजार असे एकूण ३९ लाख ५० हजार या देाघांच्या सांगण्यावरुन गुंतवणुक केली होती. ठरल्या प्रमाणे काही दिवस ७६ हजार रुपये प्रतिमहिना दराने पैसे मिळाले. नंतर आणखी गुंतवणीचा प्लॅन घेवून बियाणी पुतापुत्राला भाग पाडत होते. मात्र, त्यांनी अधिकची चौकशी केली असता हर्बालाईफची सिस्टर कंपनी केअर न्युट्रीशन कंपनीच अस्तीत्वात नसल्याचे उकडकीस आले. फेब्रुवारी महिन्यात हर्बोलाईफचे प्रॉडक्ट विक्रीचे दुकानही बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने बियणी पिता-पुत्राने रामानंदनगर पेालिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहे.