चोपड्यात तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेलेला मुलगा विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 06:45 PM2018-01-14T18:45:31+5:302018-01-14T18:51:11+5:30
चोपडा शहरातील साने गुरूजी कॉलनीत आज मकर संक्रातीच्या दिवशी आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवित असलेल्या १३ वर्षीय मुलाचा पतंग तारांमध्ये अडकल्याने तो आसारीच्या साह्याने काढण्यासाठी गेला असता मुख्य वाहिन्यांच्या तारांमधील विजेचा धक्का बसून हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
चोपडा, दि.१४ : येथील साने गुरुजी कॉलनीतील रहिवासी व पंकज विद्यालयात इ ७ वी त शिकणारा विद्यार्थी ओम नरेंद्र पवार (१३) हा रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेला असता मेन लाईनच्या तारांमधील विजेचा जबर शॉक लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, सनपुले, ता. चोपडा येथील आश्रमशाळेतील शिक्षक नरेंद्र पवार यांच्या साने गुरुजी कॉलनीत असलेल्या घराच्या छतावर त्यांचा मुलगा ओम हा पतंग उडवित होता. त्याचा पतंग मेनलाईनच्या तारेत अडकल्याने हा पतंग लोखंडी आसारीने काढत असतांना ओमला विजेचा जबर धक्का बसला. यावेळी तो फेकला गेला परंतु घराच्या छताच्या पडदीत अडकल्याने छतावरून खाली कोसळण्यापासून वाचला. त्याच वेळी सदर तार तुटली व मोठा स्फोटासारखा आवाज झाला. हा आवाज एवढा मोठा होता की, कॉलनीतील सर्व जण कसला स्फोट झाला हे पाहण्यासाठी घराबाहेर आले. यावेळी ओमचे वडील देखील छतावर गेले व त्यांनी मुलाला लाकडाच्या साहाय्याने बाजूला केले. हा मुलगा या दुर्घटनेत जवळपास ५० ते ६० टक्के भाजला गेला असून त्याच्या संपूर्ण अंगावरील कातडी निघून गेली आहे. तर छातीला आणि पोटाला जबर मार लागला आहे. दरम्यान, त्याला तातडीने उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याची स्थिती गंभीर असल्याने त्याला धुळे येथे हलविण्यात आले, मात्र धुळे येथूनही त्याला नाशिक येथे उपचारासाठी नेण्यात आल्याचे समजले आहे.
दरम्यान, या परिसरात विजेच्या मुख्य वाहिन्याचे जाळे असल्याने वर्ष दोन वर्षात असा अपघात घडत असल्याचे कॉलनीतील लोकांनी सांगितले. या मुख्य वीज वाहिनीच्या तारा कॉलनीतून बाहेर हलविण्याची मागणी यावेळी अनेक नागरिकांनी केली.