भुुसावळ येथे रेल्वे अतिक्रमणधारकांचा मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 07:32 PM2019-04-18T19:32:10+5:302019-04-18T19:34:26+5:30
भुसावळ येथील रेल्वे हद्दीतील रहिवाशांचा रेल्वे प्रशासनाने भविष्याचा कोणताही विचार न करता बेघर करून, घरांवर लोकप्रतिनिधींच्या देखत बुलडोझर चालवले व पुनर्वसनही करण्यात आले नाही. यामुळे विस्थापितांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन रहिवाशांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले.
भुसावळ, जि.जळगाव : येथील रेल्वे हद्दीतील रहिवाशांचा रेल्वे प्रशासनाने भविष्याचा कोणताही विचार न करता बेघर करून, घरांवर लोकप्रतिनिधींच्या देखत बुलडोझर चालवले व पुनर्वसनही करण्यात आले नाही. यामुळे विस्थापितांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन रहिवाशांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे हद्दीत ब्रिटिशकालीन रहिवास असतानासुुद्धा शहरातील हद्दीवाली चाळ, आरपीएफ बँरेक, भीमवाडी, चांदमारी चाळ, आगवालीचाळ तसेच प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, पाच या भागातील रहिवाशांचे संसार क्षणातच उद्ध्वस्त करून राखरांगोळी केली. वास्तविक महाराष्ट्र शासनाने २०१० पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित केलेली असताना आमच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता नियम धाब्यावर ठेवून रस्त्यावर आणले. ज्याप्रमाणे जालियनवाला बागेच्या हत्याकाडांप्रमाणे त्यावेळेस लोकांची अवस्था झाली होती त्याच पद्धतीने रेल्वे प्रशासनाने आम्हाला गोरगरीब समाजाच्या घरांवर बुलडोझर चालवून किड्या-मुंग्याप्रमाणे घरे नष्ट केली. आमच्या मुलांच्या भविष्याचा काहीएक विचार केला नाही. एखादी नैसर्गिक आपत्ती, भूकंप व महापूर याप्रमाणे आमची घरे डोळ्यादेखत मातीच्या ढिगाºयाखाली दाबली गेली. आमचे भविष्यही हरपले गेले आणि हे सर्व चित्र सुरू असताना लोकप्रतिनिधी मात्र बघत होते. संसार रस्त्यावर आल्यानंतर पुनर्वसनासाठी तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ, अशी खोटी आश्वासने दिली. जर लोकप्रतिनिधींना या गोष्टीची आधीच कल्पना होती त्यांनी आधीच आमचे पुनर्वसन का केले नाही? का आम्हाला हक्काचे घर दिले नाही, असा आरोप केला आहे.
निवेदनामध्ये अशा पद्धतीने समाज बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केले आहेत. सर्व अतिक्रमित प्रभावित नागरिक लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही निवेदनात म्हटल आहे.
निवेदनावर राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, संजय घोडके, कमलाबाई निकम, आशा घोडस्वार, मंगल साळवे, रंजना साळवे, वैशाली महाले, निर्मला लेमोसे, शोभा इंगळे, आरती बोदडे व शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.